कोल्हापूर (Kolhapur) : जिल्हा परिषदेकडील (Kolhapur Zilha Parishad) जुन्या वाहनांच्या विक्रीचे टेंडर (Tender) लवकरच निघणार असून, महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या वाहनांमध्ये (Vehicle) टोयोटा (Toyota), महिंद्रा (Mahindra), रेनॉल्ट (Renault), टाटा (Tata) आदी कंपनीच्या वाहनांचा समावेश आहे. किलोमीटर मर्यादा संपल्याने या वाहनांची विक्री केली जाणार आहे. बहुतांश वाहने ही पदाधिकारी यांनी वापरली आहेत. तसेच काही वाहने ही आरोग्य विभागाशी (Health Department) संबंधित आहेत. यापूर्वी जवळपास २५ पेक्षा अधिक वाहनांचा लिलाव (Auction) करण्यात आला होता. यावेळीही किमान १५ ते २० वाहनांचा लिलाव होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेची दरवर्षी काही वाहने निर्लेखन केली जातात. नवीन वाहनाची व्यवस्था झाली, खरेदी झाली की जुनी वाहने विक्रीस काढतात. गतवर्षी २५ पेक्षा अधिक वाहनांचा लिलाव करण्यात आला होता. यामध्ये जिल्हा परिषदेला चांगले उत्पन्न प्राप्त झाले. गतवेळचा लिलाव हा ऑनलाईन पद्धतीने पार पडला. यामध्ये शेवटच्या सेकंदापर्यंत बोली लागली होती. जीप खरेदीसाठी अनेकांनी बोली लावली होती. एका जीपची तर सुरुवातीची बोली ३० हजार इतकी होती ती शेवटी १ लाख ४० हजारपर्यंत गेली. अशाच पद्धतीने इतर वाहनांनाही चांगली किंमती मिळाली.
यावेळी इको स्पोर्ट, इटियॉस, सनी, बोलेरो, जीप, टाटा सुमो, स्वीफ्ट डिझायर आदी वाहनांची विक्री होणार आहे.यातील बहुतांश वाहने ही आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी वापरली आहेत. या वाहनांचे आत्तापासूनच बुकिंग सुरु झाले आहे. कोणी, किती किंमतीला कोणते वाहन घ्यायचे याची तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे या वर्षाही जिल्हा परिषदेला जुन्या वाहन विक्रीतून चांगले उत्पन्न मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.