कोल्हापूर : सातारा-कागल सहा पदरीकरण कामापाठोपाठ कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टेंडर मागवण्यात आले आहेत. दोन टप्प्यात तब्बल २७४४ कोटी रूपयांचे हे काम असून टेंडर मंजूर झाल्यानंतर दोन वर्षात हे काम पूर्ण करावे लागणार आहे. टेंडर दाखल करण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर आहे.
कोल्हापुरला कोकणशी जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. हाच रस्ता कोल्हापुरातून पुढे सांगलीमार्गे नागपूरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो. सद्या हा रस्ता दुपदरी आहे, काही ठिकाणी या मार्गावर सिंगल वाहतूकच करावी लागते. त्यामुळे हा मार्ग म्हणजे अपघाताला निमंत्रण देणारा ठरला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी या महामार्गाचे चौपदरीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे यावर फक्त चर्चा सुरू होती, पण आता या कामाची निविदाच प्रसिध्द झाल्याने त्याला गती येणार आहे.
रत्नागिरी ते पैजारवाडी व पैजारवाडी ते चोकाक (ता. हाततकणंगले) अशा दोन टप्प्यात हे काम होणार आहे. यातील एका कामासाठी १७१२ कोटी तर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी १०३२ कोटी रूपयांचे टेंडर प्रसिध्द करण्यात आले आहे. पैजारवाडी ते चोकाक या मार्गावरील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी आपली जमीन देण्यास विरोध केला आहे. या विरोधाला राजकीय पाठबळ मिळाल्याने जमीन संपादनाचे कोल्हापूर जिल्ह्यातील काम अपूर्ण आहे. रत्नागिरी ते पैजारवाडीपर्यंत जमीन संपादन शंभर टक्के झाले आहे, पण त्यापुढील जमीन संपादनाची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या विरोधामुळे थांबली आहे.
गेल्या महिन्यात कागल-सातारा या सहापदरीकरण कामाची सुरूवात केंद्रीय दळवळण व रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात गडकरी यांनी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गासाठी आवश्यक जमीन संपादनाचे काम तातडीने करण्याची सुचना केली होती. पण अद्याप या कामाला सुरूवात झालेली नाही.
दृष्टीक्षेपात टेंडर
एकूण लांबी - १२१ किलोमीटर
पहिल्या ६६ किलोमीटरसाठी निधी - १७१२ कोटी
दुसऱ्या ५५ किलोमीटरसाठी निधी - १०३२ कोटी
एकूण टेंडरची रक्कम - २७४४ कोटी
कामाचा कालावधी - ७३० दिवस (२ वर्षे)
टेंडर फार्म पहिल्या टप्प्यासाठी - १ लाख ८० हजार रूपये
टेंडर फार्म दुसऱ्या टप्प्यासाठी - १ लाख १० हजार रूपये