कऱ्हाड (Karad) : शहराच्या अत्याधुनिकीकरणाचा पाया रचणाऱ्या जितक्या योजना आहेत, त्यात सर्वाधिक महत्त्वाची योजना म्हणजे भुयारी गटार योजना. त्या योजनेने शहरासह पालिकेला देशात आणि राज्यात कऱ्हाडला वेगळा लौकिक निर्माण करून दिला. त्या योजनेने या महिन्यात पन्नाशी गाठली आहे.
भुयारी गटार योजना म्हणजेच जलनि:स्सारणला दोन नोव्हेंबरला ५० वर्षे पूर्ण झाली. ती योजना १९६६ मध्ये लोकार्पण झाली होती. त्यावेळी योजनेसाठी तब्बल ४१ लाख ४० हजारांचा खर्च आला होता. ती योजना कऱ्हाडच्या विकासातील मैलाचा दगड ठरते आहे. या योजनेच्या आधुनिकीकरणालाही मागील महिन्यात शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे योजनेचे आधुनिकीकरण होणार आहे.
कऱ्हाडच्या तालुका स्तरावरील गावात ५० वर्षांपूर्वी साकारलेली भुयारी गटार योजना राज्यातील पहिली योजना ठरली होती. आरोग्यविषयक धोक्यापासून त्यामुळे शहराची सुटका झाली. ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव चव्हाण व तत्कालीन नगराध्यक्ष (कै.) पी. डी. पाटील यांच्या दूरदृष्टीतून ही योजना साकारली. त्यामुळे शहरी सार्वजनिक आरोग्य गेल्या ५० वर्षांत चांगले राहण्यास मोलाची मदत झाली.
कऱ्हाडला साकारलेली योजना आजच्या काळातही काळात मैलाचा दगड ठरत आहे. त्यापूर्वी मैला डोक्यावरून वाहून नेला जात होता. ती प्रथा या योजनेने बंद झाली. भुयारी गटार योजना सांडपाणी व मैलापाणी भूमिगत वाहिन्यांमधून वाहून नेले जाऊ लागले. त्यामुळे दुर्गंधी, साथ रोग, डासांचा त्रास कमी झाला.
दोन नोव्हेंबर १९७४ ला दिवाळी पाडव्याला दिवशी तत्कालीन परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते योजनेचे उद्घाटन झाले होते. त्या दिवशीही दिवाळी पाडवा होता. योजनेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त ड्रेनेज कर्मचाऱ्यांनी (कै.) यशवंतराव चव्हाण समाधिस्थळ व (कै.) पी. डी. पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन अभिवादन केले.
कऱ्हाडमध्ये शासनाच्या माध्यमातून तालुकास्तरावरील पहिली भुयारी गटार योजना राबवण्याचा निर्णय झाला. त्या योजनेचे भूमिपूजन १९६६ मध्ये झाले. १९७४ मध्ये योजनेचे उद्घाटन पंपिंग स्टेशन क्रमांक तीनमध्ये झाले होते.
शहरात सर्वत्र सांडपाणी व मैलापाणी प्रश्न गंभीर झालेला असताना कऱ्हाडसारख्या छोट्या शहरांमध्ये भुयारी गटार योजना सुमारे ५० वर्षांपूर्वी साकारण्यात आली. योजनेमुळे शहरी नागरी जीवन बदलण्यास मदत झाली. शहरातील सार्वजनिक शौचालयाचा मैला भूमिगत पाइपलाइनने जोडण्यात आला. वैयक्तिक शौचालयांनाही पाइपलाइन जोडण्यात आल्या.
योजनेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. ती अद्यापही टिकून आहेत. शहरात चढउतार असेल तेथील मैला वाहून नेण्यासाठी सहा ठिकाणी पंपिंग स्टेशन केले आहेत. त्यातील पंपिंग स्टेशन क्रमांक एक यशवंत हायस्कूलमागे, दुसरे डुबल गल्ली पत्राचाळ येथे, तिसरे रुक्मिणीनगरला आणि चौथे स्मशानभूमीत आहे. संपूर्ण शहराची प्रत्येक स्टेशनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ते मैलापाणी व सांडपाणी थेट बारा डबरे येथे जाते.
स्टेशन क्रमांक दोनचे मैला व सांडपाणी पंपिंग स्टेशन क्रमांक तीनमध्ये पाठवले जाते. तिथून ते ऑक्सिडेशन पॉण्डवर बारा डबरे येथे नेले जाते. त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीला वापरण्यास दिले जाते. पाणी नदीत मिसळत नाही, अशा पद्धतीने नदी प्रदूषणावर मात केली आहे.
शहरातील मैला पाण्याचे शुद्धीकरण हा पालिका प्रकल्प होता. मात्र, शुद्ध केलेल्या पाण्याचे काय करायचे, हा खरा प्रश्न होता. त्यासाठी पाणी वाखाणातील शेतीस देण्याचा प्रयोग ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी दूरदृष्टीने राबवला. ५० वर्षांपासून तीही योजना अखंडपणे सुरू आहे. आजपर्यंत ही योजना कधीही बंद पडली नाही. नागरीकरण प्रचंड प्रमाणात वाढूनही योजना अखंडपणे सुरू आहे.
योजनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिनाभरापूर्वी राज्य शासनाने या योजनेच्या आधुनिकीकरणाला मंजुरी दिली आहे. त्या माध्यमातून शहरातील योजनेला नवे रूप देण्यात येणार आहे. त्याचा आराखडाही लवकरच आखण्यात आला आहे. लवकर आधुनिकीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्या कामाकडेही लक्ष आहे.