सोलापूर (Solapur) : माढा तालुक्यातील मोडनिंब येथे नवीन एमआयडीसी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महामंडळाचे प्रकरण सहा लागू करून मोडनिंब येथील एमआयडीसीला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
आमदार शिंदे म्हणाले, की माढा मतदारसंघातील मौजे मोडनिंब हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून मोडनिंब ही मोठी बाजारपेठ म्हणून सर्वत्र परिचित आहे. तसेच मोडनिंब शहर राष्ट्रीय महामार्गावर आहे. तसेच मोडनिंब हे गाव ब्रॉडगेज रेल्वेलाईन शेजारी येत असल्याने या ठिकाणी लहान मोठ्या उद्योगांना चालना मिळणार असल्याने या ठिकाणी नवीन एमआयडीसी होण्यासाठी स्थानिक नागरिक, व्यापारी, लहान-मोठे उद्योगी यांच्याकडून मागणी होत होती. या संदर्भात कार्यवाही करण्याबाबत तत्कालीन उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्यानंतर मौजे मोडनिंब येथील ११२.२७ हे. आर. व मौजे सोलकरंवाडी येथील २५. ३९ हे. आर. असे एकूण १३७. ६६ हे. आर क्षेत्र या जागेची क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून पाहणी करून भू निवड समितीकडून अहवाल शासनास सादर करण्यात आला होता. तसेच शासनाच्या उच्च अधिकार समितीने या प्रस्तावीत क्षेत्रास मान्यता दिलेली आहे. तसेच या क्षेत्राचा कंटूर सर्व्हेदेखील झाला असून या क्षेत्रास प्रकरण महामंडळाचे प्रकरण ६ लागू करणे अद्याप बाकी होते अशी माहिती आमदार शिंदे यांनी दिली.
मुंबई येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक होऊन मोडनिंब येथे नवीन एमआयडीसी होण्यासाठी महामंडळाचे प्रकरण ६ लागू करून भूसंपादनाची कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे नवीन एमआयडीसी होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. बैठकीप्रसंगी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महाव्यवस्थापक (भूसंपादन), प्रादेशिक अधिकारी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास तोडकरी, जिल्हा दूध संघ संचालक शंभू मोरे, माजी उपसरपंच विशाल मेहता उपस्थित होते. या निर्णयामुळे पंचक्रोशीतील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोडनिंब येथे नवीन एमआयडीसी होण्यासाठी शासनस्तरावर सन २०१८ पासून पाठपुरावा सुरू होता. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महामंडळाचे प्रकरण ६ लागू करून नवीन एमआयडीसी मार्ग सुखकर केला आहे. एमआयडीसीमुळे मोडनिंबच्या विकासाला चालना मिळणार असून या भागातील बेरोजागर तरूण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच मोडनिंब येथील बाजारपेठ, रेल्वे वाहतूक, व्यापारी, लहान-मोठे उद्योग यांनादेखील चालना मिळणार आहे. एक प्रकारे मोडनिंब येथे औद्योगिक क्रांती घडून येणार आहे.
- बबनराव शिंदे, आमदार, माढा