इचलकरंजी (Ichalkaranji) : सरकारच्या विविध दोन योजनांतून काढलेल्या ८४ पैकी ८३ विकासकामांच्या टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र संबंधित ठेकेदारांना प्रदीर्घ कालावधीनंतरही कार्यादेश दिलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेऊन विचारणा केली.
कमी दराच्या टेंडर आल्यामुळे महापालिकेचे सुमारे १ कोटी ४१ लाखांची बचत होत असताना संबंधित ठेकेदारांना कार्यादेश देण्यास विलंब का, असा सवाल यावेळी उपस्थित केला. याबाबतची प्रक्रिया सुरू असून, सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार लवकरच कार्यादेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सरकारच्या विविध दोन योजनांतून एकूण ८४ विकासकामांचे टेंडर काढले होते. त्यापैकी एका कामाच्या टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेशही दिला असून, संबंधित काम पूर्णही झाले आहे, मात्र उर्वरित ८३ कामांचे पहिला कागदपत्रांचा व दुसरा दर पत्रकाचा लिफाफा फोडला आहे. यामध्ये अनेकांनी ५ ते २५ टक्के कमी दराचे टेंडर भरल्याचे समोर आले आहे, पण त्यानंतर अनेक दिवस या कामांबाबत संबंधित मक्तेदारांना कार्यादेश दिलेले नाहीत. दुसरीकडे प्रशासकीय कामकाजात काही कारभारी मंडळीचा हस्तक्षेप वाढत असल्याची चर्चेने काही दिवसांपासून जोर धरला आहे. त्यामुळे फेरटेंडर काढण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आयुक्त दिवटे यांची आज भेट घेऊन विचारणा केली. कार्यादेश देण्यास इतका विलंब का, असा सवाल उपस्थित करीत बाहेर सुरु असलेल्या चर्चेचा तपशीलही दिला. त्यावर आयुक्त दिवटे यांनी याबाबतची प्रक्रिया सुरू असून, पावसाळ्यात कामे करण्यास मनाई असल्यामुळे कार्यादेश दिले नसल्याचे सांगितले. कामे दर्जेदार होण्यासाठी तांत्रिक पडताळणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. लवकरच कार्यादेश देऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले. शिष्टमंडळात शशांक बावचकर, मदन कारंडे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, नितीन जांभळे यांचा समावेश होता.
विकासकामे दृष्टिक्षेप
एकूण विकासकामे - ८४
कार्यादेश दिलेली कामे - १
कार्यादेशाच्या प्रतीक्षेतील कामे - ८३
एकूण ठेकेदार संख्या - १९