सोलापूर (Solapur) : सोलापूर - पुणे (Solapur - Pune) आणि सोलापूर - विजापूर (Solapur - Vijapur) हे दोन्ही रस्ते चार पदरी आहेत. वाहनांची वाढती संख्या पाहता हे दोन्ही रस्ते सहा पदरी करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले.
विजयपूर रोड, नेहरूनगर शासकीय क्रीडा मैदान येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र आयोजित सहा महामार्गांवरील प्रकल्पांचे भूमिपूजन व चार महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडकरी बोलत होते.
गेल्या सात वर्षांमध्ये सर्वाधिक निधी हा सोलापूर जिल्ह्यासाठी देण्यात आला आहे. सोलापूरहून इतर शहराला जोडणारे राज्यमार्ग, जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, ग्रीन एक्स्प्रेस हायवे, बाह्यवळण रस्ते, पूल आदींच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी ६० हजार कोटींची कामे करण्यात आली आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी सात हजार कोटींची कामे मंजूर असल्याने येत्या काही वर्षामध्ये शहराचे रुपडे बदलताना दिसेल, असे गडकरी यांनी सांगितले.
लॉजिस्टिक पार्क फायदेशीर ठरेल
सुरत -चेन्नई मार्गावर लॉजिस्टिक पार्कसाठी राज्य सरकारला जागा देण्यास त्यांनी सांगितले. यात राज्याचाही फायदा होईल आणि त्या त्या शहरांचा विकास होईल, असे सांगत सोलापूरकरांनी आणखी काय वेगळे करायचे आहे तेही सांगावे, असे गडकरी म्हणाले.