मुंबई (Mumbai) : विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजनेचा तिसरा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा (सुप्रमा) प्रस्ताव आहे. या प्रस्तावास राज्य तांत्रिक सल्लागार समितीची एप्रिलपर्यंत मान्यता मिळेल. त्यानंतर एक महिन्यात शासनाची मान्यता देण्यात येईल. साधारणतः येत्या दोन महिन्यात विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजनेची ‘सुप्रमा’ देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात सदस्य अनिल बाबर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. फडणवीस म्हणाले, टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्राच्याजवळ परंतु सिंचनापासून वंचित सातारा जिल्ह्यातील खटाव व माण तालुका, सांगली जिल्ह्यातील जत तालुका व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका यामधील 109 गावांमधील 41 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाचा लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
विस्तारित टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असून या कामाचा अंतर्भाव करून या प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील यांनी सहभाग घेतला.