कोल्हापूर (Kolhapur) : राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध पाहता शक्तिपीठ महामार्ग होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.
भूसंपादनासाठी निधी माझ्याच विभागाकडून जातो, यामुळे मी निधी दिल्याशिवाय भूसंपादनाचे काम होणार नाही. या बाबत मुंबईत गेल्यावर मी सविस्तरपणे माहिती घेईन. जरूरत पडली तर तुमच्या शिष्टमंडळाला बोलावेन, असेही पवार यांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. गिरीश फोंडे यांनी शक्तिपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूरसह बारा जिल्ह्यांचे शेतकरी आंदोलन करत आहेत. शासनाने तत्काळ हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी केली.
मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री हे केवळ तोंडी स्थगिती असल्याचे सांगतात. पण दुसरीकडे शेतकऱ्यांना नोटीस देत आहेत. तसेच पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवत आहेत. हे चुकीचे आहे, असे फोंडे यांनी निदर्शनास आणून दिले. यावर पवार म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे माझा देखील या शक्तिपीठ महामार्गाला ठाम विरोध आहे. हा महामार्ग होणार नाही. पर्यावरण विभागाच्या मान्यतेसाठी दिलेल्या प्रस्तावाचा पुरावा कोणाकडे नाही.