सातारा (Satara) : शहर व परिसरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने स्वत:च्या अखत्यारीत त्या कामासाठी दुसरी संस्था नेमली आहे. या प्रक्रियेस पालिका प्रशासनानेही संमती दर्शवली आहे. ठेका एकाच्या नावे अन् दुसऱ्याला काम, असे हस्तांतरित करण्याची नेमकी ही पद्धत कशासाठी, कोणासाठी? राबविली जात आहे. याचे कोणतेही ठोस उत्तर सध्यातरी पालिका प्रशासनाकडून मिळत नाही.
शहर आणि विस्तारित भागातील कचऱ्याचे संकलन केल्यानंतर त्यावर सोनगाव डेपोत प्रक्रिया होते. यासाठी पालिका प्रशासनाने येथील कामे ठेकेदारी तत्त्वावर काही जणांना दिली होती. अशाच पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चालविण्याचे काम पालिकेने परराज्यातील एका ठेकेदारास दिले होते. कामातील अनियमितता, राजकीय, प्रशासकीय हस्तक्षेप आणि इतर कारणांमुळे या कामामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. वारंवारच्या या कटकटींना कंटाळून परराज्यातील त्या ठेकेदाराने पाच वर्षांसाठी दिलेला ठेका अर्धवट सोडले. हे करण्यापूर्वी पालिकेने त्या ठेकेदारास नोटिसा बजावणे, दंड ठोठावण्यासह बिल कपातीची कारवाई केली होती.
पालिका प्रशासनाशी वारंवार होणारा संघर्ष टाळण्यासाठी त्या ठेकेदाराने हे काम थांबविणे पसंतच केले. डेपोतील हे काम बंद असल्याने त्याठिकाणी कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली होती. यामुळे पालिका प्रशासनाने मध्यंतरीच्या काळात सुवर्णमयी मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न करत त्यासाठी पुणे येथील एकाची मदत घेतली होती. या कामाच्या अनुषंगाने वारंवार ओरड होऊ लागल्यानंतर पालिका प्रशासनाने त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या. या हालचालींसाठी देखील मध्यममार्गाचा अवलंब करण्यात आल्याचे समोर येत आहे.
कामाचा ठेका घेतलेल्या पहिल्या ठेकेदारास काळ्या यादीत न टाकता, त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई न करता, त्याच्याच संमतीने सोनगाव कचरा डेपोतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी दुसरी संस्था, ठेकेदार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर पालिका प्रशासनाने नुकतेच शिक्कामोर्तब केले आहे.
कामांच्या दर्जाचा प्रश्न...
पालिकेच्या सर्वच विभागांत ठेकेदारांची मोठी साखळी आहे. प्रशासकीय, राजकीय वरदहस्तावर विविध कामे घेऊन नंतर ती टक्केवारी ठेऊन इतरांना विकण्याचे मोठे रॅकेट पालिकेत कार्यरत आहे. या ठेकेदारांमुळे व त्यांच्या कार्यपद्धतीमुळे शहरातील विविध विकासकामांच्या दर्जाचा प्रश्न निर्माण होताना दिसतो आहे.
नवा पायंडा अडचणीचा...
कचरा डेपोतील काम आणि त्याठिकाणचे ठेके यापूर्वी वारंवार चर्चेत होते. याविषयी लोकनियुक्त कार्यकारिणी काळात सभागृहात चर्चा होत होती. कार्यकारिणी नसल्याने प्रशासन सुसाट असून, अलीकडेच त्यांनी ठेकेदार, त्याने नेमलेल्या संस्थेशी मनोमिलन करत ठेक्याचे हस्तांतरण केले आहे. हा पायंडा भविष्यात पालिकेला अडचणीत आणणारा ठरणार आहे.