सोलापूर (Solapur) : शहरातील एप्रिल २०२२ नंतर मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे महापालिकेच्या १० कोटी कामांना ब्रेक लागला असून, यात १३ समाजमंदिरे आणि नऊ इतर मूलभूत सुविधांची कामे रखडली आहेत.
राज्यातील नव्या सरकारने एप्रिल २०२२ नंतर महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण राज्यभरातील साधारण नऊ हजार कोटींच्या कामांना स्थगिती मिळाली आहे. त्यात सोलापूर महापालिकेतील १० कोटींच्या कामांचा समावेश आहे. सरकारच्या विशेष निधीअंतर्गत शहरात १३ समाजमंदिरे आणि नऊ रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली होती. यामध्ये शासनाचा ७५ आणि महापालिकेचा २५ टक्के असा निधीचा हिस्सा होता. परंतु राज्य सरकारने तूर्तास या कामांना स्थगिती दिल्याने ही प्रस्तावित कामे आता रखडली आहेत.
ही आहेत २२ कामे
कन्नड भवन, वाल्मिकी समाजमंदिर बांधणे, कुरुहिनशेट्टी समाजमंदिर, गवळी समाजासाठीचे लक्ष्मी सांस्कृतिक मंदिर, सहस्रार्जुन क्षत्रिय समाजमंदिर, छत्रपती शिवाजी महाराज बहुउदेशीय सभागृह बांधणे, पद्मशाली समाजाकरिता मार्कंडेय सांस्कृतिक भवन, मुस्लिम समाजासाठी भवानी पेठेत समाजमंदिर, गोंधळी व जोशी समाजासाठी सांस्कृतिक भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन, रूपाभवानी येथे वडार समाज सभागृह बांधणे, लिंगायत समाज स्मशानभूमी सुशोभीकरण अशा १३ कामांसह ६, ७, १० व ११ या चार प्रभागांमधील नऊ रस्तेकामांचा समावेश आहे.
कोठेंच्या कामांना लागला ब्रेक
शासनाकडून १३ समाजमंदिरे व नऊ रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १० कोटींच्या कामांपैकी तब्बल ७ कोटींची कामे ही माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी सुचविलेली होती. त्यातील बहुतांश कामे ही त्यांच्याच प्रभागातील आहेत. आता शासनाने स्थगिती दिल्याने ही सर्व कामे रखडली आहेत.