बेळगाव (Belgaum) : सदाशिवनगर येथील डिझेल दाहीनीचे (Diesel Crematorium) गॅस दाहिनीत (Gas Crematorium) रुपांतर करण्यासाठी महापालिकेने टेंडर (Tender) प्रक्रिया राबविली आहे. अर्थात महापालिकेने तेथे गॅस दाहिनी तयार करण्यासाठी आवश्यक साहित्याचे दर पुरवठादारांकडून मागविले आहेत. ३० मार्च रोजी याबाबतची कोटेशन नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छूक पुरवठादारांनी सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत स्वखर्चातून भेट द्यावी व तेथे सध्या अस्तित्वात असलेल्या डिझेल दाहिनीची पाहणी करून माहिती घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी प्रशासक एम. जी. हिरेमठ व आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यानी पत्रकार परीषद घेतली होती. त्यावेळी त्यानी डिझेल दाहिनीचे गॅस दाहिनीत रुपांतर केले जाणार असल्याचे सांगितले होते. आता त्याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. तेथे आता गॅस दाहिनी करण्यासाठी ज्या साहित्याची गरज आहे, त्या साहित्याचे दर पुरवठादारांकडून घेतले जाणार आहेत. ज्यांच्याकडून सर्वात कमी दर नमूद केले जातील, त्यांच्याकडून साहित्य खरेदी केले जाईल व तेथे गॅस दाहिनी तयार केली जाईल. पण डिझेल दाहिनी तयार करण्यासाठी जो ६० लाख रूपयांचा खर्च झाला आहे, त्याची वसुली महापालिका कोणाकडून करणार, हा प्रश्न कायम आहे.
सदाशिवनगर स्मशानभूमीत सध्या जी डिझेल दाहिनी आहे, तीचे काम डिसेंबर २०१७ मध्ये सुरू झाले होते. बेळगावातीलच एका ठेकेदाराकडे या कामाचा ठेका होता. एप्रिल २०२० मध्ये ते काम पूर्ण झाले. २०२० साली कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यावर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर डिझेल किंवा विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्याचा नियम तयार करण्यात आला. पण त्यावेळी बेळगावातील डिझेल दाहिनीचे काम पूर्ण झाले नव्हते. तत्कालीन महापालिका आयुक्त के. एच. जगदीश व आरोग्याधिकारी डॉ. संजय डूमगोळ यानी ठेकेदाराला बोलावून काम पूर्ण करण्याची सूचना दिली. त्यानुसार एप्रिल महिन्यात ते काम ठेकेदाराने पूर्ण केले. एका बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करून डिझेल दाहिनीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यासाठी जास्त प्रमाणात डिझेल लागते हे स्पष्ट झाले. शिवाय अंत्यसंस्कारासाठी विलंब लागत असल्याचेही महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे डिझेल दाहिनीचा वापर नंतर केला नाही. गेल्या दोन वर्षांपासून डिझेल दाहिनी वापराविना आहे. त्या डिझेल दाहिनीचे गॅस दाहिनीत रुपांतर करण्याचे प्रयत्न गतवर्षी झाले. एका कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला, पण २३ लाख रूपये खर्च सांगितला. त्यामुळे महापालिकेने तो निर्णय मागे ठेवला. पण आता गॅस दाहिनीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करून तेथे गॅस दाहिनी तयार करणार आहे. साहित्य खरेदीनंतर डिझेल दाहिनीचे गॅस दाहिनीत रुपांतर करण्याचे काम सुरू केले जाणार आहे.