अहमदनगर (Ahmednagar) : चोवीस तास विद्युत पुरवठा करण्यासाठी एक्स्प्रेस फिडर नसल्याने महापालिकेची महत्त्वाकांक्षी भूयारी गटार योजना अनेक दिवसांपासून रखडली होती. मात्र, महापालिकेने तीन कोटी ३० लाखांची तरतूद करत या कामाचा प्रश्न मार्गी लावला आहे. एक्स्प्रेस फिडरचे काम सुरू झाल्याने शहरातील महत्त्वाकांक्षी भूयारी गटार योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेने अमृत अभियानांतर्गत १३१ कोटी रूपयांची भूयारी गटार योजनेचे काम हाती घेतले आहे. मध्यवर्ती शहरासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे. त्यात सुमारे ११९ किलोमीटरपर्यंत भूयारी लाईन टाकण्यात येणार आहे. योजनेच्या कामाला २०१७ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला असून, हे काम २०२२ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु सहा वर्ष उलटले तरी योजना कार्यान्वित झालेली नाही. योजना कार्यान्वित करण्यासाठी चोवीस तास वीज पुरवठा आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या एक्स्प्रेस फिडरचा योजनेच्या प्रकल्प अहवालात समावेश नव्हता. त्यामुळे हे काम रखडले होते. अखेर महापालिकेने या कामासाठी महापालिका फंडातून तीन कोटी ३० लाखांची तरतूद केली. स्थानिक ठेकेदार संस्थेला हे काम देण्यात आले आहे. कामाला सुरूवात झाली आहे. एक्स्प्रेस फिडरचे हे काम पूर्ण झाल्यानंतर भूयारी गटार योजना कार्यान्वित होणार आहे. कनेक्शन सिस्टिम, ट्रंक मेन, नाला इंटर सेक्टर, पंपिंग हाऊस आदी कामे पूर्ण झाली आहेत.
सुरूवातीला भूयारी गटार योजनेच्या प्रकल्प अहवालात एक्स्प्रेस फिडरचा समावेश नव्हता. त्यामुळे महापालिका फंडातून निधीची तरतूद करण्यात आली आहे. निविदा काढून या कामास सुरूवात देखील करण्यात आली आहे. मागविण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.
- मनोज पारखे, शहर अभियंता
योजनेचा खर्च - १३१ कोटी
योजनेची लांबी - ११९ किमी
एक्स्प्रेस फिडर खर्च- ३.३० कोटी
मनपाचा थकीत स्वःहिस्सा- ११ कोटी
झालेली कामे
- कनेक्शन सिस्टिम ९५ टक्के पूर्ण
- ट्रंक मेन काम पूर्ण
- नाला इंटर सेक्टर पूर्ण
- पंपिंग हाऊस ९५ टक्के पूर्ण
- पंपिंग मेन ८५ टक्के पूर्ण
- मलशुद्धीकरण केंद्र ९५ टक्के पूर्ण
सांडपाण्याचा प्रश्न सुटणार
शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूयारी गटार योजना महत्त्वाची आहे. नगरकर गेल्या अनेक वर्षांपासून भूयारी गटार पूर्ण होण्याची प्रतिक्षा करत आहेत. परंतु योजनेचे काम रखडल्याने शहरातील सांडपाण्यासह मैलामिश्रित पाण्याची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
महत्त्वाकांक्षी योजना
शहरातून वाहणाऱ्या सीना नदीत मैलामिश्रित पाणी सोडले जाते. याप्रकरणी हरित लवादाने महापालिकेला वारंवार दोषी ठरवून लाखो रूपयांचा दंड केला आहे. त्यामुळे महापालिका व शहराच्या दृष्टीने भूयारी गटार ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
उपनगरांसाठी स्वतंत्र योजना
मध्यवर्ती शहराप्रमाणेच केडगाव, सावेडीमह, बोल्हेगाव- नागापूर या उपनगरांसाठी स्वतंत्र भूयारी गटार योजना करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने यावर्षीच्या अंदाजपत्रकात मोठी अर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे उपनगरातही भूयारी गटारचा प्रश्न मार्गी लागणार आहे.