अहमदनगर (Ahmednagar) : महापालिकेच्या वतीने बुरूडगाव रोड परिसरात अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येत आहे. रुग्णालयाच्या या बांधकामाविरोधात हेमंत ढगे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून, याचिकाकर्ते ढगे यांना दाव्याच्या खर्चापोटी दहा हजार रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
महापालिकेने बुरूडगाव रोड परिसरात रुग्णालय बांधण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या टेंडरमधील इस्टिमेटपेक्षा चार टक्के जास्तीची रक्कम बांधकाम ठेकेदाराला दिली. हा जनतेचा पैसा असून, तो जास्तीचा का दिला? असा प्रश्न उपस्थित ढगे यांनी उपस्थित केला होता.
हे बांधकाम थांबविण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
जनतेच्या हितासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासन यांना असे रुग्णालय बांधण्याचा अधिकार आहे. महापालिकेने तसा ठराव मंजूर केलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठरावास मान्यता दिल्यानंतरच बांधकामास सुरुवात करण्यात आलेली आहे. टेंडर प्रसिद्ध करून ठेकेदार संस्थेशी वाटाघाटी करूनच बांधकामाचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. शिवाय आता रुग्णालयाचे बांधकाम देखील ३५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झालेले आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयाचे बांधकाम थांबविणे संयुक्तिक होणार नसल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
विशेष म्हणजे दाव्याच्या खर्चापोटी ढगे यांनी दहा हजार रुपये भरावेत, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.