सोलापूर (Solapur) : तब्बल नऊ वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या, शहरातील मुख्य वर्दळीच्या १७ रस्त्यांच्या कामांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात तरतूद केलेल्या भांडवली निधीतून 25 कोटी 70 लाख रुपयांचे रस्त्यांच्या कामांचे टेंडर बुधवारी काढण्यात आले.
शहरातील मुख्य मार्गांवर जडवाहतुकीसह अन्य वाहतुकीचे वर्दळ असलेल्या अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. रस्ते कोणाचे, देखभाल कोण करणार, रस्ते हस्तांतरण आणि रस्त्यांच्या दुरुस्तीवर निधी खर्च कोण करणार अशी प्रशासकीय अडचण महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नॅशनल हायवे यांच्यात निर्माण झाली होती. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत अखेर आयुक्तांनी दुर्लक्षित रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या रस्त्यांची यादी तयार करण्यात आली. नगरसेवकांनी सूचविलेल्या भांडवली कामाऐवजी आयुक्तांनी प्रभाग, परिसर, शहर अथवा हद्दवाढ असा कोणताच दुजाभाव न करता शहरातील सामूहिक रस्तेविकासाला प्राधान्याला देत २०२२-२३ या नव्या अंदाजपत्रकाची भांडवली निधीतून २५ कोटी ७० लाख रुपये खर्चून १७ शहरातील रस्ते नूतनीकरण करण्यात येत आहे. यासाठी बुधवारी टेंडर काढण्यात आले.
मार्कंडेय मिरवणूक मार्गासह १७ मार्ग
मोदी पोलीस चौकी ते गुरुनानक चौक, गुरुनानक चौक ते बोरामणी नाका, दयानंद कॉलेज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, सात रस्ता ते सावस्कर नर्सिंग होम, डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौक ते मेकॅनिक चौक, आसरा चौक ते डि मार्ट चौक, डी मार्ट ते भारतीय विद्यापीठमार्गे राष्टीय महामार्ग, कुमठा नाका ते ७० फूट रोड मार्केट परिसर, सुंदरम नगर पाणी टाकी ते आरटीओ ऑफिस, फुरडे काम्पलेक्स ते आडवा नळ, कुमठे रेल्वे गेट ते कुमठे गाव, सम्राट चौक ते बाळीवेस, बलिदान चौक ते रुपाभवानी चौक, बेडरपूल ते जगदंबा चौक, कुंभारवेस ते भवानी पेठ चाटला साडी सेंटर, अरविंद धाम ते मंगळवेढा रोड आणि राजेश पायलट मार्ग ते अक्कलकोट रोड.
नऊ वर्षानंतर लागला मुहूर्त
या १८ मार्गावर जडवाहतुकीसह अन्य वाहतुकीची वर्दळ मोठी आहे. २०१२-१३ या कालावधीत नगरोत्थान योजनेंतर्गत बनविण्यात आले होते. नियमानुसार या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती ही दर तीन वर्षांनी होणे अपेक्षित होते. गेल्या नऊ वर्षांपासून याकडे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्यांची पुरुती वाट लागली आहे. अखेर नऊ वर्षांनी टेंडर निघाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शहरातील दोन नवे रस्त्यांचा समावेश करीत एकूण १७ रस्त्यांसाठीचे आज टेंडर काढण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी काम हाती घेतले तरी पावसाचा अंदाज घेत रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येईल. काम लवकर होण्याच्या दृष्टीने ही निवदा सहा भागांमध्ये विभागून काढली आहे. पावसाळ्यानंतर चार महिन्यांची मुदत या कामासाठी असणार आहे.
- संदीप कारंजे, नगरअभियंता