मुंबई (Mumbai) : वित्तीय सेवा फर्म '360 वन'चे सह-संस्थापक यतीन शाह यांनी मुंबईच्या आलिशान वरळी भागात डॉ. ॲनी बेझंट रोडस्थित सुपर-लक्झरी निवासी मालमत्ता खरेदी केली आहे. समुद्राच्या किनारी असलेल्या या आलिशान पेंटहाऊसची किंमत सुमारे 158 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
हा व्यवहार सुमारे 1.54 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट या दराने झाला आहे, सध्याच्या घडीला देशातील प्रति स्क्वेअर फूट दराचा विचार करता हा सर्वात महागडा व्यवहार ठरला आहे. यतीन शाह यांनी त्यांच्या पत्नीसह, निवासी टॉवरच्या वरच्या दोन मजल्यावरील हे आलिशान 10,312 चौरस फूट डुप्लेक्स अपार्टमेंट प्राईम रियल्टी एलएलपी या कंपनीकडून खरेदी केले आहे. राजकारणी व उद्योगपती प्रफुल्ल पटेल या कंपनीचे संचालक आहेत.
खरेदीदाराने 30 ऑक्टोबर रोजी कराराच्या नोंदणीसाठी 9.51 कोटी रुपयांहून अधिक मुद्रांक शुल्क भरले आहे, तर व्यवहार 28 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाला. या मालमत्तेत 29 व्या आणि 30 व्या मजल्यांचा समावेश आहे. 29व्या मजल्यावर 5,513 चौरस फूट जागा आहे. तर 30व्या मजल्यावर 4,799 चौरस फूट जागा आहे.
करण भगत आणि यतीन शाह यांनी स्थापन केलेली, 360 ONE WAM स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट आहे, कंपनी भारतातील सर्वात मोठी संपत्ती आणि मालमत्ता फर्मपैकी एक आहे. 360 ONE हे उच्च नेट वर्थ व्यक्ती (HNI) आणि अल्ट्रा HNI विभागातील 7,500 संबंधित कुटुंबांसाठी गुंतवणूक आणि आर्थिक सल्ला देते. कंपनीची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता 68 अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे. मुंबई देशातील सर्वात मोठी आणि सर्वात महाग मालमत्ता बाजारपेठ म्हणून आघाडीवर आहे. भारतातील सर्वात महागडी घरे दक्षिण आणि मध्य मुंबईत आहेत. गेल्या काही वर्षांत, मायक्रो मार्केटमध्ये उद्योगपती, कॉर्पोरेट अधिकारी, अभिनेते आणि क्रीडा व्यक्तिमत्त्वांचा समावेश असलेले अनेक मोठे सौदे याठिकाणी झाले आहेत.