मुंबई (Mumbai) : कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे देशव्यापी वीजसंकटामुळे १५ राज्यांमध्ये भारनियमन सुरू आहे. या परिस्थितीतही मागणी वेढलेली असतानाही महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. महावितरणच्या प्रभावी नियोजन व उपाययोजनांमुळे गेल्या शुक्रवारपासून मागणीएवढा वीजपुरवठा केला जात आहे.
कोळसा टंचाई आणि मागणीत प्रचंड वाढ झाल्याने देशातील अनेक राज्यांना भारनियमनाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र महाराष्ट्रातील भारनियमन टाळण्यासाठी महावितरणने सूक्ष्म नियोजन करून वीज कशी उपलब्ध होईल, याबाबत उपाययोजना केल्या. त्यामुळे शुक्रवारपासून (ता. २२) गुरुवारपर्यंत (ता. २८) महावितरणने राज्यात सर्व वीजवाहिन्यांवर अखंडित व सुरळीत वीजपुरवठा केला.
महावितरणने गुरुवारी मुंबई वगळता उर्वरित राज्यात उच्चांकी २४ हजार ७ मेगावॉट वीजपुरवठा केला. या कामगिरीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरण व महानिर्मिती या दोन्ही कंपन्यांचे कौतुक केले.
सर्व २७ संच कार्यान्वित
राज्यात आठवडाभरापासून अखंडित आणि मागणीएवढा वीजपुरवठा केल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच महानिर्मितीनेही राज्यातील सर्व २७ संच कार्यान्वित करून वीजनिर्मिती वाढवली आणि अखंडित वीजपुरवठ्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना साथ दिली, याबद्दल महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले.