मुंबई (Mumbai) : मुंबई, पुण्यात राहणाऱ्या नोकरदारवर्गाचे ‘म्हाडा’चे घर मिळविण्याचे स्वप्न असते; मात्र या वर्षी ‘म्हाडा’ने राज्यात केवळ १२ हजार ७२४ घरे प्रस्तावित केली आहेत. त्यामुळे अनेकांचे हे गृहस्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. यात प्राधिकरणाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण १२,७२४ घरांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ५८००.१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईत २,१५२ घरे प्रस्तावित
मुंबई मंडळांतर्गत येत्या आर्थिक वर्षात २,१५२ घरांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी ३,६६४.१८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोकण मंडळांतर्गत ५,६१४ सदनिका
कोकण मंडळांतर्गत ५,६१४ घरांची उभारणी करण्याचे प्रस्तावित असून २०२३-२४ च्या अर्थसंकल्पी अंदाजपत्रकात त्यासाठी ७४१.३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यातील इतर मंडळांसाठी निधी
(मंडळ........ प्रस्तावित सदनिका.......... २०२३-२४च्या अर्थसंकल्पात निधी)
पुणे मंडळ.... ८६२........ ५४०.७० कोटी
नागपूर मंडळ.... १४१७........ ४१७.५५ कोटी
औरंगाबाद मंडळ.... १४९७........२१२.०८ कोटी
नाशिक मंडळ.... ७४९.... ७७.३२ कोटी
अमरावती मंडळ....४३३....१४६.२४ कोटी
शून्य तुटीचा अर्थसंकल्प
प्राधिकरणाच्या २०२३-२०२४ च्या १०,१८६.७३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व २०२२-२०२३ च्या सुधारित ६९३३.८२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पात शून्य तूट तर २०२२-२०२३ च्या सुधारित अर्थसंकल्पात १,१३६.४७ कोटी रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे