मुंबई (Mumbai) : खरी शिवसेना नेकमी कोणाची यावरून गोंधळाची परिस्थिती असल्याचा प्रकार नुकत्याच घडलेल्या मुंबईतील घटनेतून समोर आला. वरीळीतील कोळीवाड्यातील कोस्टल रोडमुळे बाधित झालेल्या नागरिकांनी आपल्या न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी काही जणांनी शिंदेच्या गटात प्रवेश केला होता. माध्यमांनी ही घटना आदित्य ठाकरेंना धक्का असल्याचे दाखवत दिवसभर दाखविली. मात्र संध्याकाळी बरोबर उलटे चित्र समोर आले. कारण कोळीवाड्यातील नागरिकांनी 'मातोश्री'वर दाखल होत आम्ही शिवसैनिकच आहोत असा दावा केला. त्यावरून पुन्हा आरोप प्रत्यारोपांना सुरवात झाली आहे. (Coastal Road - Warali Koliwada)
वरळीतील कोस्टलबाधित नागरिकांनी सकाळी ‘वर्षा’ निवासस्थानी जात शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि संध्याकाळी ‘मातोश्री’वर जात आम्ही उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याचे सांगितल्याने ‘कोस्टल’बाधित नेमके कोणाच्या बाजूने, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वरळीतील कोस्टलबाधित शेकडो नागरिकांनी आज एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. कोळीवाड्यातील नागरिकांनी एकत्रपणे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी धाव घेतली.
हे सर्व नागरिक उद्धव ठाकरे यांचे समर्थक होते; मात्र आता त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना धक्का बसल्याची दिवसभर चर्चा होती. या सर्व नागरिकांना शिंदे गटात सहभागी करण्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी प्रयत्न केले. कोस्टल रोडचा सर्वाधिक फटका वरळीच्या कोळीवाड्यातील मच्छीमार तसेच नागरिकांना बसला आहे. यासाठी या बाधित नागरिकांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे सतत न्याय मिळावा म्हणून मागणी केली; मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप या नागरिकांनी केला होता.
मात्र, संध्याकाळी वेगळे चित्र पाहायला मिळाले. शिवसेनेचे विधानपरिषद आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वात सायंकाळी वरळी विधानसभेतील शेकडो शिवसैनिक ‘मातोश्री’वर दाखल झाले. यामुळे आज सकाळी शिंदे गटाला समर्थन देणारे आणि सायंकाळी ‘मातोश्री’वर दाखल झालेले शिवसैनिक पाहता शिवसेनेचा वरळीतील खरा वारस कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोस्टल रोडच्या संदर्भातील समस्यांचे निवेदन द्यायचे आहे, असे सांगून दिशाभूल करण्यात आली, पण काही जणांनी प्रवेश केलेला असला तरी बहुसंख्य आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ते शिवसैनिक आहेत, हे सांगण्यासाठी ‘मातोश्री’वर दाखल झाले, पण प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून स्थानिकांसह राज्याची दिशाभूल केली जात आहे.
- सचिन अहीर, शिवसेना नेते