मुंबई (Mumbai) : फ्रेंच स्कॉर्पिओ बनावटीच्या वागशीर पाणबुडीचे (Vagsheer Submarine) पुढील आठवड्यात जलावतरण करण्यात येणार आहे. माझगाव डॉकने (Mazagon Dock) या पाणबुडीची निर्मिती केली असून, ती जलावतरणास सज्ज आहे. माझगाव डॉकनिर्मित युद्धनौका व पाणबुड्यांमध्ये जास्तीत जास्त स्वदेशी भाग वापरण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
या पाणबुडीची निर्मिती पूर्ण झाली असून, लवकरच तिचे जलावतरण झाल्यावर वर्ष दीडवर्ष तिच्या बंदरात तसेच खोल समुद्रात चाचण्या होतील. त्यानंतरच तिचा समावेश नौदल ताफ्यात केला जाईल. या पाणबुडीतील चाळीस टक्के भाग स्वदेशी असून, यापुढील पाणबुड्यांमध्ये हे प्रमाण साठ ते सत्तर टक्के एवढे नेण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष व्हाईस अॅडमिरल (निवृत्त) नारायण प्रसाद यांनी दिली.
स्वदेशी युद्धनौका निर्मितीसाठी आवश्यक असे तिचे पोलाद, केबल, पाईप ही सामुग्री भारतात तयार होते. तिचे इंजिन, गॅस टर्बाईन, शाफ्ट, गिअर, उर्जानिर्मिती ही छोट्या क्षमतेची यंत्रे भारतात तयार होतात. मात्र मोठ्या यंत्रसामुग्रीसाठी आपल्याला परदेशावर अवलंबून रहावे लागते. मोठे गॅस टर्बाईन, प्रोपल्शन इंजिन बनविण्यात डीआरडीओ ला देखील अद्याप यश आले नाही. आपण ही यंत्रसामुग्री युक्रेन व अमेरिकेकडून घेतो, यांच्या तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.
जागतिक विक्रम हुकला
माझगाव डॉकमध्ये युद्धनौका व पाणबुड्यांची निर्मिती वेळेत सुरू आहे. मात्र मागील वर्षी तीन युद्धनौका व पाणबुड्यांचे जलावतरण एकाचवेळी करण्याचा विश्वविक्रम कोरोना परिस्थितीमुळे हुकला. तरीही या वर्षाअखेरीस एकाच दिवशी, निदान एकाच आठवड्यात दोन युद्धनौका व पाणबुड्यांचे जलावरण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती नारायण प्रसाद यांनी दिली.
लांब पल्ल्याचे 'ब्राह्मोस'
यावर्षी नौदलाकडे सुपूर्द केल्या जाणाऱ्या एका अत्याधुनिक विनाशिकेवर अतिरिक्त लांब पल्ल्याचे ब्राह्मोस क्षेपणास्त्र बसविले जाईल. नौकेच्या चाचण्या करताना या क्षेपणास्त्राच्याही चाचण्या केल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.