मुंबई (Mumbai) : मुंबई विद्यापीठाचे (University of Mumbai) कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या कुलगुरू पदाची मुदतही केवळ काही महिन्यांवर आलेली असताना त्यांच्याकडून विद्यापीठातील पायाभूत सुविधा आणि इतर कामकाजासंदर्भात कोट्यवधी रुपयांचे टेंडर मंजूर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी 25 मे रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याविषयी महत्त्वाचा विषय चर्चेला येणार आहे. मात्र त्यावर कोणाचे लक्ष जाऊ नये याची खबरदारी म्हणून ही बैठक ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार असल्याची माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली.
मुंबई विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा नियोजन अंमलबजावणी व देखभाल विभागाच्या माध्यमातून विद्यापीठातील इमारत दुरुस्ती, बांधकाम, डागडुजी, रंगरंगोटी आणि इतर तत्सम कामकाज पाहिले जाते, दरवर्षी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. परंतु मागील काही वर्षात विद्यापीठातील हे कामकाज करण्यासाठी ठराविक कंत्राटदारांना कामकाज दिले जात असून त्यावर विद्यापीठातील अधिकारी वर्गाची मोठी नाराजी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, विद्यापीठाच्या कुलगुरूंची मुदत ही केवळ चार महिने शिल्लक आहे, मात्र याच काळामध्ये त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या कामकाजाचे टेंडर आणि त्यासाठीच्या प्रक्रिया वेगाने सुरू आहेत. शिवाय पायाभूत सुविधा नियोजन अंमलबजावणी व देखभाल विभागाच्या कामकाजासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती आहे. या समितीतील अंतिम निर्णय हे कुलगुरू घेत असतात. 10 मे रोजी विद्यापीठातील कोट्यवधी रुपयांच्या टेंडर प्रकरणात संदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली होती, त्यामध्ये झालेल्या विषयानुसार मुंबई विद्यापीठात सध्या 3 लाखांच्या दरम्यान खर्चाची रक्कम असलेल्या 52 हून अधिक टेंडर व त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. तर 11 टेंडरची कामे सध्या प्रगतीपथावर असून 6 टेंडर आणि त्यांचे कामेही नुकतीच पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यासोबत इतर कामकाज आणि त्यासाठीच्या कोट्यवधी रुपयांचे टेंडर पुन्हा मंजूर केल्या जाणार असल्याचेही सूत्राकडून सांगण्यात आले.