मुंबई (Mumbai) : कोविड महामारीतून बांधकाम क्षेत्र सावरल्यानंतर आता मुंबईत आलिशान घरांच्या खरेदी विक्रीचे मोठं-मोठे व्यवहार पूर्ण होत आहेत. यातून मुंबईतील जागेला सोन्याहून अधिक भाव मिळताना दिसत आहे. नुकतीच वरळीतील दोन सदनिकांची विक्री तब्बल १५१ कोटींना झाली आहे. ९५ हजार रुपये प्रति चौरस फूट दराने एकूण १६०७२ चौरस फूटांच्या या दोन घरांचा व्यवहार झाला आहे. घर खरेदीच्या बाबतीत देशात मुंबई हे सर्वात महागडे शहर म्हणून ओळखले जाते.
वरळीत अल्ट्रा-लक्झरी प्रकल्प ३६० (थ्री सिक्स्टी) नावाची इमारत असून यात आलिशान अशी घरे आहेत. अभिनेता शाहिद कपूरसह अन्य कलाकारांचीही घरे आहेत. याच इमारतीतील दोन घरे नुकतीच १५१ कोटी रुपयांत विकली गेली. त्याची दस्तनोंदणी ८ सप्टेंबरला झाली असून प्रति चौरस फूट ९५ हजार रुपये अशा विक्रमी दरात ही दोन्ही घरे विकली गेली आहेत. यातील एक घर ५८ व्या आणि दुसरे घर ५९ व्या मजल्यावर आहे. ८०३६ चौ फुट क्षेत्रफळाचे एक घर आहे.
या घरांसाठी खरेदीदाराने ९ कोटी ६ लाख रुपये इतके मुद्रांक शुल्क भरले आहे. आयजीई इंडिया प्रा. लि. नावाच्या कंपनीने ही घरे खरेदी केली आहेत. तर ओऍसिस रियल्टीकडून घरांची विक्री करण्यात आली आहे. मुंबईत आलिशान घरांना मागणी आहे. याच इमारतीतील घरे यापूर्वी ६५ ते ७० हजार रुपये प्रति चौरस दरात विक्री झालेली आहेत. आता या इमारतीला निवासी दाखला मिळाला असून त्यात सहा वाहने उभी करण्यासाठी जागा देण्यात आली आहे.