मुंबई (Mumbai) : कुलाबा ते सीप्झ हा 'मेट्रो-३' प्रकल्प जून २०२४ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित होणार असला तरी जसजसे कामाचे टप्पे पूर्ण होतील. त्याप्रमाणे मार्ग खुला केला जाईल. आरे-बीकेसीनंतर थेट वरळीपर्यंत मेट्रो सुरू केली जाऊ शकते, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली. तसेच या मार्गिकेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी नऊ कंपन्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 'दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन' व 'केओलीस एसए' या कंपन्यांची निवड झाली आहे, अशी माहिती सुद्धा भिडे यांनी दिली.
भिडे म्हणाल्या की, पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तेथे सेवा सुरू केली जाईल. त्यानंतर एक-एक टप्पे सुरू केले जातील. आम्ही जून २०२४ ची वाट पाहणार नाही. या प्रकल्पातील 'पॅकेज-४'चे काम पूर्ण झाले आहे. सर्व तयारी झाल्यास वरळीच्या आचार्य अत्रे चौकापर्यंत 'मेट्रो' सुरू केली जाईल. ३३.५ किमी मार्गाच्या या प्रकल्पातील ७ वे पॅकेज पूर्ण तयार आहे. तर ४, ५ व ६ हे लवकरच तयार होतील. यातील पॅकेज १ हा मार्ग जवळजवळ तयार आहे. गिरगाव-काळबादेवी या पॅकेजच्या उभारणीला वेळ लागत आहे. या 'अॅक्वा'लाईनला बीकेसी, सहार रोड, आचार्य अत्रे चौक, वरळी, सीएसएमटी व कफ परेड येथे रुळ बदलण्याची सुविधा दिली आहे.
बीकेसी ते आरे हा मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. जानेवारी २०२४ पासून हा मार्ग खुला होईल. हा प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण केला जाईल. गिरगाव, काळबादेवी स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. कफ परेडच्या टर्मिनल स्टेशनपर्यंतचा मार्ग पूर्णपणे तयार होईपर्यंत या दोन स्थानकांवर मेट्रो न थांबवून मार्ग खुला करण्याचाही विचार आहे. यामुळे प्रवाशांना दोन स्थानके वगळता संपूर्ण मार्गिकेचा वापर करता येईल, असे त्या म्हणाल्या.
या मार्गिकेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी नऊ कंपन्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन व केओलीस एसए या कंपन्यांची निवड झाली आहे. 'मेट्रो-३' हा प्रकल्प भविष्यात नेव्हीनगरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. हे काम १.५ किमीचे आहे. या प्रकल्पाचा अहवाल दोन महिन्यात तयार होईल. नंतर टेंडर मागवली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.