मुंबई (Mumbai) : 'बेस्ट'च्या १,४०० इलेक्ट्रिक बस टेंडर प्रक्रियेत अपात्र ठरविल्याच्याविरोधात टाटानंतर आता जेबीएम इकोलाईफ मोबिलिटी प्रा लि. या कंपनीने मुंबई महापालिकेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे. टेंडर प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन करुन प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमासाठी महापालिकेच्यावतीने तब्बल १४०० इलेक्ट्रिक बस मुंबई आणि उपनगरासाठी घेतल्या जाणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेने टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे. यापूर्वी टाटा कंपनीने देखील महापालिकेच्या विरोधात टेंडर प्रक्रियेत अपात्र ठरविण्यात आल्यानंतर याचिका केली होती. आता जेबीएम कंपनीने देखील अपात्रतेविरोधात याचिका केली आहे. टेंडर प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन करुन प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप याचिकेत केला आहे.
मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. दरम्यान, संबंधित टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राट मंजूर केले असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने खंडपीठाला देण्यात आली. त्याची दखल घेत याचिकेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर भूमिका स्पष्ट करण्याचे महापालिकेला निर्देश देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली आहे.