मुंबई (Mumbai) : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 प्रकल्पाच्या भुयारीकरणाचा 41 वा टप्पा नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण झाला. 'तानसा-2' ही टनेल बोअरिंग मशीन महालक्ष्मी मेट्रो स्थानकापासून डाऊन लाइन मार्गाचे 832.5 मीटर भुयारीकरण करत मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकात पोहोचली. 555 सिमेंट रिंग्सच्या सहाय्याने 262 दिवसांत हे भुयारीकरण पूर्ण झाले. मेट्रो-3 प्रकल्पाच्या भुयारीकरणाचे 98.60 टक्के काम पूर्ण झाले असून आता फक्त दीड टक्केच काम शिल्लक आहे.
मेट्रो-3 प्रकल्पातील पॅकेज-3 मध्ये पाच स्थानके असून या प्रकल्पातील हा सर्वात लांबचा टप्पा होता. या पॅकेजमध्ये मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या पॅकेजमधील भुयारीकरणाचे पाच टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. मेट्रो-3 प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण कुलाबा ते सीप्झपर्यंत संपूर्ण डाऊन लाईन भुयारीकरण पूर्ण झाल्याची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई महानगर आयुक्त आणि मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी यावेळी दिली.
मुंबई मेट्रो -३ ही कुलाबा–वांद्रे-सिप्झ पट्ट्यामधून धावेल व नरीमन पॉइंट, वांद्रे–कुर्ला संकुल, फोर्ट, लोअर परळ, गोरेगाव इत्यादी आर्थिक केंद्रांना सुद्धा जोडेल. मेट्रो मुळे विमानतळ, नरीमन पॉइंट, कफ परेड, काळबादेवी, वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, विमानतळ, सिप्झ व एमआयडीसी प्रथमच जोडले जातील. त्याशिवाय मुंबई मेट्रो -३ च्या मार्गामुळे चर्चगेट व छत्रपती शिवाजी टर्मिनल सारखी ऐतिहासिक वारसा असलेली स्थानके सुद्धा जोडली जातील.
आज उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी असते. जिथे फक्त १,७५० प्रवासी बसू शकतात, तिथे ५००० लोक प्रवास करीत असतात. मेट्रो -३ मुळे हा भार जवळपास १५% कमी होणे अपेक्षित आहे. मुंबई मेट्रो -३ मुळे रहदारीचा होणारा खोळंबा टाळता येईल व त्यात वाया जाणारा महत्वाचा वेळ वाचवता येईल. एकदा अंमलबजावणी झाल्यावर मुंबई मेट्रो -३ मुळे या पट्ट्यातील रहदारी सुमारे ३५% ने किंवा वाहनसंख्या सुमारे ४.५० लाखांनी कमी होऊन रस्त्यांवरील कोंडी कमी होईल. सध्या कफ परेड ते विमानतळ हे अंतर पूर्ण करण्यासाठी १०० मिनिटे लागतात, पण मुंबई मेट्रो -३ मुळे हाच वेळ ५० मिनिटे होईल.