मुंबई (Mumbai) : सागरी किनारी मार्गाच्या (Coastal Road) बोगद्याचे 2 किलोमीटरचे खोदकाम पूर्ण झाले आहे. आता उर्वरीत 70 मीटरचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे. वरळी ते नरीमन पॉईंटपर्यंतच्या 10 किलोमीटरहून अधिक लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पाचे 50 टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.
किनारी मार्गासाठी मलबार हिल, गिरगाव चौपाटी खालून चार किलोमीटरहून अधिक लांबीचे दोन बोगदे बांधण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या बोगद्याचे काम प्रियदर्शनी पार्क येथून सुरु झाले असून आतापर्यंत 2 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेने कोविडचा प्रार्दुभाव असताना वर्षभरात हा महत्वाचा टप्पा पार केला आहे. उर्वरित 70 मीटरचे काम संपल्यानंतर दुसऱ्या बोगद्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
या दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी 2.070 किलोमीटर असून व्यास 12.19 मीटर आहे. बोगद्यांचे खोदकाम करताना आतल्या बाजूने वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रिटचे अस्तरीकरण केले जाते. त्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी 11 मीटर इतका असणार आहे. दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील.
या बोगद्यांचे खोदकाम बोगदा खणणारे संयंत्र टनेल बोअरींग मशिनच्या सहाय्याने केले जात असून या यंत्राचे नामकरण ‘मावळा’असे करण्यात आले आहे. 12.19 मीटर व्यास असणार्या मावळा संयंत्राची उंची 4 मजली इमारती एवढी आहे. तर लांबी 80 मीटर असून वजन 2800 टन आहे. स्लरी ट्रीटमेंट प्लांटच्या यंत्रसामुग्रीचे वजन सुमारे 600 टन आहे. 'मावळा'चे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी बोगदा खणावयाचा आहे, त्याठिकाणी प्रथम 'बेंटोनाईट' मिश्रित पाण्याचा अत्यंत वेगवान फवारा केला जातो. त्यानंतर संयंत्राच्या चकती प्रकारच्या पात्याद्वारे बोगदा खणला जातो. बोगदा खणल्यामुळे निघणारी माती, खडी इत्यादी ही आधी फवारलेल्या पाण्यामध्ये एकत्र होऊन खडी व माती मिश्रित पाणी तयार होते. हे पाणी 'मावळा' या संयंत्राद्वारे खेचून बाहेर टाकले जाते. ते पुन्हा प्रक्रिया करुन वापरले जाते. खोदकामातून निघणारे खडक व खडी यांचाही उपयोग भराव कामात करण्यात येत आहे.
बोगद्याचे महत्वाचे टप्पे
- कामाला सुरुवात 11 जानेवारी 2021
- एक किलोमीटरचा टप्पा - 4 सप्टेंबर 2021
- दोन किलोमीटरचा टप्पा - 29 डिसेंबर 2021