मुंबई (Mumbai) : गेल्या दोन दशकात ठाणे (Thane) जिल्ह्याची लोकसंख्या (Population) जवळपास दुपटीने वाढली आहे. मात्र जिल्ह्यात सध्या एकही सुपरस्पेशालिटी रुग्णालय (Super Specialty Hospital) अस्तित्वात नाही. अस्तित्वातील जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर सुपरस्पेशालिटीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर शहरातील पार्किंग प्लाझा येथे दुसरे मल्टीस्पेशालिटी (Multispecialty Hospital) रुग्णालय उभारण्याचे ठाणे महापालिकेच्या (TMC) विचाराधीन आहे.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयातील भोंगळ कारभार आणि गैरप्रकार वेळोवेळी उघडकीस आला आहे. वशिल्याने झालेली भरती, त्यामुळे अधिकारी आणि कामगार रुग्णांना जुमानत नाहीत, बहुतांशी ठेकेदार अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून महापालिकेच्या तिजोरीची लूट करतात, हेही उघड झाले आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाचे डीन डॉ. योगेश शर्मा यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांना दिले होते.
ठाणे जिल्ह्याचा नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. गेल्या दोन दशकात जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास दुपटीने वाढली आहे; मात्र या जिल्ह्यात अद्याप एकही सुपरस्पेशालिटी रुग्णालय नाही. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे प्रयत्न गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहेत.
अलीकडेच या रुग्णालयाचे टेंडर मंजूर झाले असून, जुन्या इमारतींचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे, लवकरच जिल्ह्यातील पहिल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात होणार आहे.
ठाणे महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी मेडिकल कॉलेज चालवते. त्यात मोठा गैरव्यवहार आणि खर्च होत असल्याने ते चालवणे महापालिकेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे ते शासनाने स्वतःच्या ताब्यात घ्यावे, अशी मागणी माजी गृहनिर्माण मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मागे केली होती.
मुख्यमंत्र्यांनी फक्त ठाणेकरच नव्हे, तर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांचा विचार करून हे रुग्णालय ठाणे महापालिकेच्या ताब्यातून राज्य शासनाने स्वतःकडे घ्यावे. जेणेकरून ठाणे महापालिकेच्या तिजोरीवरचा बोजा कमी होईल, येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, ठाणेकर रुग्णांचे हाल कमी होतील. हे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय चालवणे ठाणे महानगरपालिकेचे काम नाही, असे स्पष्ट मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
पार्किंग प्लाझा येथे कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठाणे महापालिकेने ११०० खाटांचे डीसीएच सुरू केले होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. हे ठिकाण शहरातील मध्यवर्ती असल्याने नागरिकांसाठी वैद्यकीयदृष्ट्या सोयीचे आहे. त्यामुळे येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचे नियोजन असून, आर्किटेक्चरल डिझाईन बनवण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे.