मुंबई (Mumbai) : ठाणे महानगरपालिकेने (Thane Municipal Corporation) शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील ९०० शौचालयांचा सर्व्हे केला होता. त्यातील ७०० शौचालये असून सुमारे ११ हजार सीट्स आहेत. आता या शौचालयांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामावर सुमारे ९८ कोटी खर्च अपेक्षित आहे.
कडी-कोंयडा, २४ तास पाणी, विजेची व्यवस्था, दरवाजे, खिडक्या, पाण्याच्या टाक्या बसवणे आदींसह इतर कामे यात केली जात आहेत. १५ जेट स्प्रे मशीनच्या माध्यमातून ९०० शौचालयांच्या सफाईची कामे करण्यात येत आहेत. शौचालयांची दुरुस्ती झाल्यानंतर ती चांगल्या स्थितीत रहावीत व त्यांची स्वच्छता चांगली रहावी यासाठी ठाणे महापालिकेचे प्रयत्न आहेत.
यापूर्वी शौचालयांची दुरुस्ती ही सुमारे १३५ महिला बचत गटांच्या माध्यमातून केली जात होती, परंतु त्यांच्याकडून कामे योग्य प्रकारे होत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे शौचालयांच्या साफसफाईची कामेदेखील महिला बचत गटाकडून काढून घेतली आहेत.
आता शौचालयांच्या साफसफाईबरोबर दुरुस्तीची एकत्रित कामे ही ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभाग समितीनुसार ठेकेदारांची नेमणूक केली आहे, परंतु मुख्य ठेकेदार हा एकच असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार १५ जेट स्प्रे मशीनच्या माध्यमातून साफसफाईला सुरुवात झाली आहे.
दिवा प्रभाग समितीसाठी एक गाडी देण्यात आली आहे; तर उर्वरित सात प्रभाग समितींमध्ये प्रत्येकी दोन गाड्या दिल्या आहेत. मुंब्य्रात देखील येत्या काही दिवसांत दोन गाड्यांचा समावेश होणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
शौचालयांची सफाई सध्या एका ठेकेदारामार्फत करण्यात येत आहे. त्या ठेकेदाराने वाहनांची देखभाल, वाहनांवरील कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर खर्चदेखील करायचा आहे. ठेकेदाराला एका सीट्समागे ८५० रुपये दिले जात आहेत. त्यानुसार महिन्याला आठ लाख तर वार्षिक १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.