मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Ahmedabad Bullet Train) प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर या तीन उन्नत स्थानकांसह महाराष्ट्र - गुजरात सीमेवरील शीळफाटा ते झारोली दरम्यान १३५ किमी लांबीच्या मार्गाचे डिझाईन आणि बांधकामासाठी एल ॲण्ड टी, एनसीसी-जे कुमार, ॲफकॉन्स-केपीटीएल आणि दिनेशचंद्र-दिल्ली मेट्रो रेल काॅर्पोरशन या चार कंपन्यांमध्ये रस्सीखेच रंगली आहे. सुमारे १६,५०० कोटी किंमतीची ही टेंडर्स आहेत.
ठाणे, विरार, बोईसर या तीन उन्नत स्थानकांसह व्हायाडक्ट, पूल, बोगदे, मेंटेनन्स डेपो आणि गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील शीळफाटा आणि झरोली गावांदरम्यान ठाणे डेपोला जोडणारी काही बांधकामे यांचा समावेश या कामांमध्ये आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र ठेकेदाराने १,७०४ दिवस अर्थात चार वर्षे ६६ दिवसांत काम पूर्ण करण्याचे बंधन आहे. या मार्गावर ११ नद्यांवरील पूल आणि सहा बोगद्यांचा समावेश आहे. या कामांचे टेक्निकल टेंडर बुधवारी उघडण्यात आले. त्यात स्पर्धेत चार कंपन्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. तांत्रिकदृष्ट्या पात्र कंपन्यांचे आर्थिक टेंडर तांत्रिक मूल्यमापन पूर्ण झाल्यावर उघडली जाणार आहेत.
यापूर्वी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील भुयारी स्थानकासह बीकेसी ते शीळफाटा दरम्यान २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गासाठी यापूर्वी टेंडर मागविली होती. मुंबईच्या बीकेसीतील ४.९ हेक्टर जागेवरील भूमिगत बुलेट ट्रेन स्थानकासाठी सर्वात कमी एमईआयएल-एचसीसी कंपनीची ३,६८१ कोटींचे टेंडर पात्र ठरले आहे. हा भुयारी मार्ग ठाणे खाडीखालून नवी मुंबईच्या घणसोली - कोपरखैरणेतून जाणार आहे. तसेच शीळफाटा येथील वाहतूककोंडी टाळण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांची रचनाही बुलेट ट्रेन मार्गासाठी बदलली आहे.
बुलेट ट्रेनसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासह इतर साहित्य ठेवण्यासाठी आणि तत्सम कामे करण्यासाठी नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत डेपाे सुरू केला आहे. याशिवाय बीकेसी ते शीळफाटाच्या आगासनपर्यंत जो भूमिगत मार्ग बांधण्यात येत आहे, त्याच्या कामावर महापे डेपोतूनच नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनसाठी ठाण्यातील २२ हेक्टर जागेचे संपादन केले आहे. यात खासगी मालकीची जमीन १८ हेक्टर आठ आर ८१ चौ. मीटर, मध्य रेल्वेच्या मालकीची ४२ आर ३९ चौ. मीटर, राज्य शासनाच्या मालकीची दोन हेक्टर ३२ आर १० चौ. मीटर, खासगी मालकीची सहा हेक्टर, ४८ आर, २१ चौ. मीटर जमिनीचा समावेश आहे. त्यासाठी मौजे आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शीळ व देसाई आदी ठिकाणचे अतिक्रमण काढले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात बुलेट ट्रेनच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या २२ हजार खारफुटींची कत्तल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती.