मुंबई (Mumbai) : एप्रिल (April) महिना अर्धा संपत आला तरी मुंबईतील नालेसफाईने (Drain Cleaning) वेग घेतलेला नाही. काही ठिकाणी धिम्या गतीने नालेसफाई सुरू असून, वेग वाढवण्याची गरज आहे. सध्या मुंबईतील वाढलेला उन्हाचा पारा पाहता पावसालाही लवकरच सुरवात होण्याची शक्यता आहे. असे झालेच तर मुंबईची 'तुंबई' होण्याची भीती मुंबई महानगर पालिकेचे (BMC) माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी व्यक्त केली.
मुंबईतील पाऊस जेमतेम दीड महिन्यांवर येऊन ठेपला आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता याही वर्षी लवकर आणि दमदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईतील नालेसफाईसाठी टेंडर प्रक्रिया उशिरा राबवल्याचा आरोप रवी राजा यांनी केला. मोठ्या नाल्यांची सफाई युद्धपातळीवर सुरू करायला हवी होती. परंतु शहरातील विविध प्रभागांमध्ये सुरू असलेले नालेसफाईचे काम अत्यंत धिम्यागतीने केले जात आहे. त्यात यंदा पाऊस लवकर सुरू झाल्यास मुंबईची 'तुंबई' होण्याची शक्यता असून, याला सर्वस्वी प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार राहतील, असेही राजा पुढे म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील मोठ्या नाल्यांसाठी एकूण ६ टेंडर मंजूर करण्यात आले असून त्यांचे मूल्य सुमारे ७१ कोटी रुपये आहे. लहान नाल्यांसाठी सुमारे ९१ कोटी रुपये एकत्रित किंमतीची १७ टेंडर मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये शहर भागासाठी २, पूर्व उपनगरांसाठी ६, तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी ९ टेंडर आहेत. म्हणजेच मोठे व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे १६२ कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
गाळ काढण्याचे उद्दिष्ट
- नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यास मदत होते. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी नाल्यांमधून गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते.
- यंदा मोठे व लहान नाले मिळून एकूण २ लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामध्ये शहर विभागात ३० हजार १४२ मेट्रिक टन, पूर्व उपनगरांमध्ये ७३ हजार ४४३ मेट्रिक टन तर पश्चिम उपनगरांमध्ये १ लाख ४८ हजार २५ मेट्रिक टन गाळ काढण्यात येणार आहे. या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी नमूद केले.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण दोन लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मे २०२२ रोजीच्या विहित मुदतीत ही कामे पूर्ण केली जातील.
- पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त