आयुक्तांनी असे रोखले 7.5 कोटीचे 'ते' कांड! 5 अभियंत्यांनाही नोटिसा

KDMC
KDMCTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : कल्याण पश्चिमेतील फडके मैदान, म्हसोबा मैदान प्रभागातील डांबरी रस्ते सुस्थितीत असताना, या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे ७ कोटी ५० लाख रुपयांचे पाच प्रस्ताव बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार केले. या प्रस्तावांमध्ये गडबड असल्याचे आयुक्तांना निदर्शनास आल्याने त्यांनी हे सर्व प्रस्ताव रोखून धरले. या अनुषंगाने महापालिकेत (KDMC) नस्ती गहाळ करण्याचे नाट्य उघडकीस आले. तर शेवटी या प्रकरणी बांधकाम विभागाच्या पाच अभियंत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

KDMC
Good News: सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

शिंदे समर्थक दोन नगरसेवकांच्या फडके मैदान, म्हसोबा मैदान प्रभागातील सुस्थितीत असलेले डांबरीकरणाचे रस्ते काँक्रिटीकरणाचे करण्याचे प्रस्ताव बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. हे प्रस्ताव शहर अभियंता विभागाकडून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आले. शहरातील बहुतांशी रस्ते सुस्थितीत आहेत.

रस्ते कामांसाठी बेताचा निधी, दायित्व असताना फडके, म्हसोबा मैदान भागातील रस्त्यांचे प्रस्ताव बांधकाम विभागाने का तयार केले? या प्रस्तावांच्या नस्तीमध्ये अर्थसकल्पीय खर्च तरतूद, दायित्व नोंदीची टिपणे नव्हती, त्यामुळे आयुक्तांना संशय आल्याने त्यांनी हे प्रस्ताव तयार करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

KDMC
त्र्यंबकेश्‍वर : नळपाणी पुरवठा योजना चोरीला; काम न करताच पैसे खर्च

अभियंत्यांनी आयुक्तांसमोर आर्जव केल्याने आयुक्तांनी पाच अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा काढण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले. या कार्यवाहीसाठी आयुक्तांच्या दालनातून रस्ते कामाच्या नस्ती सामान्य प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांच्याकडे पाठविण्यात आल्या.

सहाय्यक आयुक्त करचे यांनी आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे पाच अभियंत्यांना नोटिसीची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करून नस्ती सामान्य प्रशासन अधीक्षक, उपायुक्त यांच्याकडे पाठविणे आवश्यक होते. करचे यांच्याकडून या नस्ती वरिष्ठांकडे गेल्या नाहीत.

आयुक्तांनी अभियंत्याना देण्यात येणाऱ्या नोटिसीबाबत सामान्य प्रशासन विभागात विचारणा केली. तेव्हा अशाप्रकारे नोटिसा देण्यात आल्या नाहीत. ती नस्ती सामान्य प्रशासन विभागात आली नसल्याचे उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले. या नस्ती सहाय्यक आयुक्त करचे यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत, अशी भूमीका आयुक्त कार्यालयाने घेतली. करचे यांनी आपण शिपायांच्या माध्यमातून नस्ती पुढे पाठविल्याची भूमिका घेतली.

KDMC
Pune: 'या' क्षेत्रात अच्छे दिन! कोणी नोंदविली छप्परफाड कामगिरी?

महत्त्वाच्या नस्ती गायब झाल्याने आयुक्तांनी पोलिस तक्रार करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी आयुक्त कार्यालय ते सहाय्यक आयुक्त कार्यालय दरम्यानचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांचा शिपाई लक्ष्मण दिवेकर उर्फ लकी हा त्या महत्त्वपूर्ण नस्ती बाहेर घेऊन जाऊन संबंधित ठेकेदाराच्या 'खास इसमा'च्या हातात देत असल्याचे दिसले. करचे यांच्या दालनातून नस्ती बाहेर गेल्याचे आणि त्यांनी याविषयी संशयास्पद भूमीका घेतल्याने आयुक्तांनी करचे यांना फैलावर घेतले.

त्यानंतर शोधाशोध केल्यावर शिपाई दिवेकर यांनी बांधलेल्या गठ्ठ्यात 'हरविलेल्या' नस्ती आढळून आल्या. या नस्ती कोठून आल्या याची आपणास माहिती नसल्याचे स्पष्टीकरण दिवेकर यांनी दिले. आयुक्तांनी दिवेकर यांना तात्काळ निलंबित केले. बांधकाम विभागाच्या पाच अभियंताना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

KDMC
Mumbai : मिठी नदीच्या संवर्धनासाठी यंदा 650 कोटींची कामे

बांधकाम विभागाच्या काही नस्ती हरवल्या होत्या. पोलिसांत तक्रारीचे आदेश दिले होते. त्या नस्ती सापडल्या आहेत. या प्रकरणात शिपायाला निलंबित केले आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाणार आहे.

- डाॅ. भाऊसाहेब दांगडे, आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com