मुंबई (Mumbai) : एकीकडे पावसाळा तोंडावर आला असताना ठाणे महापालिका प्रशासन आणि ठेकेदार नालेसफाईच्या नावाने ‘हात की सफाई’ करत आहेत. कापूरबावडी, संत ज्ञानेश्वरनगर, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, गांधीनगर, वसंत विहार, नळपाडा येथील नाल्यात कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकदा ठाण्यातील नालेही पाहावेत आणि नालेसफाई अक्षम्य दिरंगाई करणाऱ्या महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामांसाठी 9 प्रभाग समितीनिहाय टेंडर काढली होती. यात जाचक अटी आणि शर्तीमुळे ठेकेदारांनी नालेसफाईच्या कामांकडे पाठ फिरवली होती. तसेच यंदा खर्चातदेखील तीन कोटींची कपात करण्यात आल्याने ठेकेदार नाराज होते. दरम्यान महापालिकेने 22 एप्रिल रोजी टेंडरला अंतिम मुदतवाढ देत अटी आणि शर्ती शिथिल केल्यानंतर ठेकेदार मिळाले. ठाण्यात लहान मोठे 640 नाले आहेत. यामध्ये कळवा प्रभाग समिती सर्वाधिक 201 नाले, दिव्यात 131, मुंब्यात 80, नौपाडा प्रभाग समितीत 49, माजिवाडा मानपाडा 44, वागळे इस्टेटमध्ये 38, लोकमान्य सावरकर प्रभाग समितीत 34, उथळसरमध्ये 34, वर्तकनगरात 29 नाले आहेत.
नालेसफाईच्या कामाला ठेकेदार मिळत नसल्याने मुंब्यात अनुभव नसलेल्या ठेकेदारावर जबाबदारी देण्यात आली असल्याचे उघड झाले. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा आणखी एक भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. हे बिंग फुटू नये म्हणून प्रशासनाने मुंब्यात काम करणाऱ्या ठेकेदाराची हकालपट्टी केली आहे. संबंधित कंपनीची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने कंपनीचे काम बंद करण्यात आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.