मुंबई (Mumbai) : ठाणे शहरातील नालेसफाईत 'हातसफाई' करणाऱ्या एका ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी दणका दिल्यानंतरही शहरातील कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट भागातील बहुतांश नाल्यांमध्ये अद्याप काहीच सफाई झाली नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारांवर कारवाईस सुरूवात केली आहे. महापालिकेने अशा ठेकेदारांना साडेआठ लाखांचा दंड ठोठावला आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने यंदा एप्रिलमध्येच नालेसफाईची कामे सुरू करण्यात आली. सुमारे १० कोटी खर्च करून नऊ प्रभागांमध्ये नऊ ठेकेदारांकडून नालेसफाई करताना आयुक्त अभिजीत बांगर यांनी नालेसफाईवर करडी नजर ठेवली होती. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे व नागरिक यांच्याकडून येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करुन नालेसफाई चांगल्या दर्जाची होण्याकडे कटाक्ष ठेवला होता. अलीकडेच उथळसर प्रभागात समाधानकारक कामे न केल्याचा ठपका ठेवून दंड आकारल्यानंतर 'मे. जे. एस. इन्फ्राटेक' या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट तसेच घोडबंदर भागातील काही नाल्यांच्या सफाईत सुद्धा ठेकेदारानी हातसफाई केल्याचे उघड झाले होते. आ. संजय केळकर आणि भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांनीही नालेसफाईची पोलखोल केली होती. अनेक नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढिग दिसून आल्याने केळकर यांनी प्रशासनावर लक्ष्य केले होते. त्यानंतर ठरवून दिलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्यास असमर्थ ठरलेल्या कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरी आणि उथळसर भागातील ठेकेदारांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. या ठेकेदारांना ८ लाख ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे नालेसफाईत कुचराई करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.