मुंबई (Mumbai) : ठाणे शहराच्या स्वच्छतेवर भर देत सार्वजनिक स्वच्छतागृहांचा कायापालट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याअंतर्गत महापालिका हद्दीतील दूरावस्था झालेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती तर काही ठिकाणी नव्याने सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. या कामावर सुमारे पाऊणशे कोटी रुपये खर्च होणार आहे.
'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या उपक्रमांतर्गत ठाणे महापालिका हद्दीत विविध विकास कामे करण्यात येत आहेत. रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, डांबरीकारण, मास्टिक पद्धतीने रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत, तर रंगरंगोटी करून शहराचा चेहरामोहरा बदलण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता स्वच्छतेवर भर देत स्वच्छतागृहांचा कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका हद्दीत सध्याच्या घडीला स्वच्छतागृहांचे ९०६ युनिट असून १२ हजार ५०० शौचालये आहेत. त्यानुसार मागील दोन वर्षापूर्वी यातील बहुतेक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली होती; परंतु पुन्हा स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मधल्या काळात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शौचालयांची पाहणी केली असता, साफसफाईच्या मुद्यावरून ठेकेदाराला आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली होती. त्यानंतर आता साफसफाईला वेग आला आहे. तसेच दिवसातून तीन तासांच्या फरकाने संबंधितांना स्वच्छतागृहांच्या साफसफाईची पाहणी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. नवीन स्वच्छतागृहे उभारणीसाठी ३५ कोटी, दुरुस्तीसाठी शासनाकडून आलेला २५ कोटी आणि मागासवर्गीय निधीतून १३.५० कोटी असा सुमारे ७३.५० कोटींचा खर्च केला जाणार आहे.
राज्य सरकारकडून आलेल्या या निधीच्या माध्यमातून स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीच्या कामात रंगरंगोटी, स्वच्छता, टाईल्स बदलणे, वीजपुरवठा, पाणी पुरवठा, कडी-कोंयडा बदलणे, दरवाजांची दुरुस्ती, खिडक्यांची दुरुस्ती आदींसह इतर महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. यातून ८०० शौचालयांची दुरुस्ती केली जाणार आहे. तर नव्याने नौपाडा- ४, उथळसर- ४, माजिवडा-मानपाडा- १३, वागळे- ३, लोकमान्य-सावरकरनगर- ५, वर्तकनगर- ९, कळवा- ८, दिवा- ४ आणि मुंब्रा- ६ याठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्यात येणार आहेत.