मुंबई (Mumbai) : ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) क्षेत्रातील नाले पावसाळ्यात तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने टेंडर प्रक्रिया पूर्ण करत येत्या काही दिवसांत नालेसफाईची कामे सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मुख्य नाले आणि त्यास जोडणारे लहान-मोठे नाले असे एकूण ३०० किमी लांबीचे नाले आहेत.
ठाणे शहरात दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. यंदा मात्र एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच म्हणजेच दरवर्षीपेक्षा १५ दिवस आधीच नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे. तशाप्रकारचे नियोजन पालिकेच्या घनकचरा विभागाकडून आखण्यात आले आहे. नालेसफाईची कामे ७ जून अखेरपर्यंत शंभर टक्के पूर्ण केल्यानंतरही पावसाळ्यात नाल्यामधील वाहता कचरा काढण्याचे आणि प्रवाहातील अडथळा दूर करण्याचे काम सप्टेंबर अखेरपर्यंत केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आली असून तेव्हापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. महापालिकेचे प्रशासक म्हणून कामकाज पाहणारे आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे दररोज शहरात दौरे करून स्वच्छता, सुशोभीकरण आणि विकासकामांचा आढावा घेत आहेत. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा शहरात दौरे करून विकासकामांचा आढावा घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री शिंदे आणि आयुक्त शर्मा यांनी नालेसफाईची कामे लवकर सुरु करण्याचे निर्देश घनकचरा विभागाला दिले होते. त्यानुसार या विभागाने प्रभाग समितीनिहाय नालेसफाईच्या कामाची टेंडर काढली होती. ही टेंडर उघडण्यात आली असून त्यातील दर निश्चिती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून पुढील आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरूवात करण्याची योजना घनकचरा विभागाने आखली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात मुख्य नाले आणि त्यास जोडणारी लहान-मोठे नाले असे एकूण ३०० किमी लांबीचे नाले आहेत. नालेसफाईचे काम हे कमी वेळेत व्हावे यासाठी नऊ प्रभाग समितीस्तरावर कामाचे विभाजन कऱण्यात आले आहे. त्यानुसार या कामाची टेंडर काढण्यात आली होती. ही कामे करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, जेसीबी, पोकलेन या मशिनचा वापर करून नाल्यातील गाळ काढण्यात येणार आहे. ज्या नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ आहे, त्या नाल्याची सफाई पालटून यंत्राद्वारे केली जाणार आहे. यंदा विशेषतः पालटून यंत्राद्वारे नाल्यांची खाडीतील मुखे साफ केली जाणार आहेत. या कामावर पर्यवेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. नालेसफाईच्या कामांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच नालेसफाईची कामे ७ जून अखेरपर्यंत शंभर टक्के पूर्ण केल्यानंतरही पावसाळ्यात नाल्यामधील वाहता कचरा काढण्याचे आणि प्रवाहातील अडथळा दूर करण्याचे काम सप्टेंबर अखेरपर्यंत केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
गेल्यावर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती. परंतु यंदा एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील पाहाणी दौऱ्यादरम्यान नालेसफाईची कामे लवकर सुरु करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, शहरात रोबोटीक यंत्राद्वारे नालेसफाईची कामे सुरुच आहेत, अशी माहिती ठाणे महापालिका उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे.
प्रभाग समितीनिहाय नाल्यांची संख्या -
कळवा - २०१, नौपाडा - ४९, वागळे इस्टेट - ३८, लोकमान्य-सावरकर - ३४, उथळसर - ३४, वर्तकनगर - २९, माजीवाडा- मानपाडा - ४४, मुंब्रा- ८०, दिवा-१३१