मुंबई (Mumbai) : ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) प्रदूषण नियंत्रण विभागाने मुंबई महानगर क्षेत्रात जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्टेवाट लावण्यासाठी टेंडर काढले आहे. ही टेंडर प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाचे आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात शासकीय तसेच खासगी रुग्णालयातून दररोज दोन टन जैव वैद्यकीय कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात प्रकल्प उभारण्यात आला होता. इन्व्हायरो व्हिजिल संस्थेमार्फत हा प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पाबाबत लोकप्रतिनिधींकडून सातत्याने आरोप होत होते. यामुळे हा प्रकल्प काहीसा वादात सापडला होता. तसेच हा प्रकल्प नियमानुसार तसेच प्रदूषणकारी असल्याचा आरोप करत तो बंद करण्याची मागणीही लोकप्रतिनिधींनी सर्वसाधारण सभेत केली होती.
या प्रकल्पाची मुदत ३० जून २०२१ संपुष्टात येणार होती. त्यामुळे मुदतवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने नामंजूर केला. तर, हा प्रकल्प अद्ययावत करण्यासंबंधीचा प्रस्ताव इनव्हायरो व्हिजील संस्थेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केला होता. मंडळने हा अर्जही नामंजूर केला होता. त्यामुळे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने मुंबई महानगर क्षेत्रात जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्रोक्त पद्धतीने विल्टेवाट लावणाऱ्या संस्थांची माहिती गोळा करून त्याद्वारे एका संस्थेची निवड करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यास सर्वसाधारण सभेची मंजुरीही मिळाली. त्यानुसार या विभागाने ठेकेदाराचा नेमण्यासाठी टेंडर काढले आहे.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प सुरु होता. मात्र तो नव्या नियमावलीत बसत नव्हता. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या संस्थेची निवड करण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. तसेच ठेकेदाराची निवड होईपर्यंत कळवा येथेच जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे," असे ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी स्पष्ट केले.