Mumbai News मुंबई : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे. ४०३ कोटी रुपयांचा खर्च यासाठी अपेक्षित आहे.
अंबरनाथसारख्या शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असावे अशी अनेक वर्षांची मागणी होती. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर हे दोघेही वैद्यकीय क्षेत्राची पार्श्वभूमी असलेले असल्याने या दोघांच्या पाठपुराव्यामुळे अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला मंजुरी मिळवण्यात यश आले.
अंबरनाथ पूर्व येथील शेतकी सोसायटीच्या भूखंडावर या महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागेचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता या महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने ४०३ कोटी ८९ लाख रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
राज्यातील पाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या उभारणीसाठी एकत्रित टेंडर प्रसिद्ध करण्यात आले असून या एकत्रित टेंडरची रक्कम २ हजार १९ कोटी ४५ लाख इतकी आहे. केंद्र सरकारच्या अंगीकृत आठ कंपन्यांकडून या कामासाठी टेंडर मागवण्यात आली आहेत. त्यामुळे अंबरनाथ शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या उभारणीला गती मिळाली आहे.
या महाविद्यालयाच्या उभारणीपूर्वीच येथील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अंबरनाथ नगरपालिकेच्या अख्यत्यारितील रुग्णालयाच्या वास्तूमध्ये अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थांना दरवर्षी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच येथील रुग्णालयात ४३० खाटा असणार आहेत.
कै. बी. जी. छाया रुग्णालय एकेकाळी अंबरनाथ आणि परिसरातील ग्रामीण रुग्णांसाठी मोठा आधार होते. मधल्या काळात राज्य शासन, अंबरनाथ नगरपालिका यांच्याकडे झालेल्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेत रुग्णालयाच्या सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष झाले होते. सध्या या रुग्णालयात सुद्धा विविध सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.