मुंबई (Mumbai) : नवी मुंबईतील खारघर-तुर्भे लिंक रोड (केटीएलआर) या ५.४९ किलोमीटर लांब मार्गाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. यात १.७६ किलोमीटरचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. सुमारे २,१०० कोटींच्या या कामाचे कार्यादेश ऋत्विक प्रोजेक्ट्स व एव्हरास्कॉन (जेव्ही) या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहेत. यामुळे शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल तसेच तुर्भे, नेरुळ, जुईनगर, वाशी या परिसरांतून खारघरमध्ये अवघ्या १० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
या मार्गात खारघर वसाहत आणि तुर्भे औद्याोगिक वसाहत या दरम्यानच्या पारसिक डोंगररांगा पोखरून १.७६ किलोमीटरचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गिकेसाठी सिडकोने ऋत्विक प्रोजेक्ट्स व एव्हरास्कॉन (जेव्ही) या कंपनीची निवड केली आहे. हा मार्ग शीव-पनवेल महामार्गावरील जुईनगर रेल्वे स्थानकासमोरून सुरू होऊन खारघरच्या गुरुद्वारा आणि सेंट्रल पार्क येथील जंक्शन तसेच खारघर कॉर्पोरेट पार्क या परिसराला जोडला जाणार आहे. हा मार्ग बांधण्यासाठी ठेकेदाराला चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. यामुळे शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच या मार्गामुळे खारघर उपनगरातील वाहनचालकांना वसाहतीमध्ये प्रवेश करण्यासाठी तिसरे प्रवेशव्दार मिळणार आहे. खारघरमध्ये प्रवेशासाठी बेलापूर भारती विद्यापीठमार्गे आणि शीव-पनवेलहून थेट प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहेत.
खारघर आणि तळोजा या दोन्ही उपनगरांमध्ये जाण्यासाठी हाच मार्ग असल्याने या मार्गावरील ताण वाढला आहे. सध्या वसाहतीमध्ये सकाळी नऊ ते दहा या वेळेत आणि सायंकाळी सात ते आठ या वेळेत उत्सव चौक ते सेंट्रल पार्क चौकापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा मार्ग सुरू झाल्यानंतर खारघरवासियांसोबत तळोजातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मार्गावर ये-जा करण्यासाठी चार वेगवेगळ्या मार्गिका असतील. यामुळे खारघर येथील व्यावसायिक कॉर्पोरेट पार्क, गोल्फ कोर्स, फुटबॉल ग्राऊंड, सेंट्रल पार्क यांपर्यंत मुंबई व नवी मुंबईतील इतर उपनगरातील रहिवाशांना काही मिनिटांत विना कोंडीचा प्रवास करून पोहोचता येईल.