मुंबई (Mumbai) : गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगर येथील पत्राचाळ म्हणून ओळख असलेल्या म्हाडा वसाहतींचा रखडलेला पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळाने टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आहे. रखडलेल्या प्रकल्पाचे 26 जानेवारीला भूमिपूजन करुन काम सुरु करण्यात येणार आहे.
सिद्धार्थनगर येथील पत्राचाळ प्रकल्प म्हाडाने खाजगी विकासकाला दिला होता. मात्र विकासकाने या प्रकल्पात गैरप्रकार केल्याने हा प्रकल्प रखडला आहे. यामुळे रहिवाशांचे हाल सुरु आहेत. हा प्रकल्प ताब्यात घेऊन म्हाडामार्फत राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार पत्राचाळ येथील मूळ 672 गाळेधारकांना गाळ्यांचा ताबा देणे, म्हाडा हिश्यातील सोडत काढलेल्या 306 सदनिकांच्या इमारतींची उर्वरित कामे पूर्ण करून विजेत्यांना ताबा देण्याची जबाबदारी म्हाडावर सोपविण्यात आली आहे. सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाने प्रकल्पातील सेक्टर आर 9 मधील पुनर्वसन इमारतीचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी टेंडर मागविले होते. या कामासाठी 142 कोटी 4 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या टेंडर प्रक्रियेला कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून 26 जानेवारीला कामाचे भूमिपूजन आणि कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे.
प्रकल्पाचे काम मार्गी लागल्यास गेली अनेक वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या मूळ गाळेधारकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच म्हाडा सोडतीमध्ये घरे मिळालेल्या विजेत्यांनाही दिलासा मिळणार आहे.