मुंबई (Mumbai) : मुंबईतील महालक्ष्मी येथील एका सोसायटीत देशातील पहिलाच सौर ऊर्जेवर (Solar Energy) आधारित वीज निर्मितीचा प्रयोग राबवला जाणार आहे. प्रदूषणमुक्त वीज निर्मितीसाठी आग्रही टाटा वीज निर्मिती कंपनी 'टीपीआरईएल' हा प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे सोसायटीच्या वीज बिलामध्ये 40 टक्के कपात होणार आहे. टाटाने याआधी नांदेड येथील हिमायतनगरमध्ये असा सौर ऊर्जेचा प्रकल्प वैयक्तिक पातळीवर उभा केला आहे.
वाढते तापमान, वाढती लोकसंख्या आणि वाढत्या आधुनिक वीज उपकरणांच्या वापरामुळे विजेची मागणी वाढली आहे. मात्र, वाढत्या विजेच्या वापरामुळे जास्तीचे वीज बिल सर्वसामान्यांना परवडणारे नसते. मुंबईतही गेल्या काही वर्षांत उंच आणि टोलेजंग इमारतींची संख्या वाढली असून पाण्याबरोबर विजेची मागणीही वाढली आहे. अशा परिस्थितीत एकदाच खर्च करून आगामी 20 ते 25 वर्षे अत्यंत माफक दरात वीज मिळवण्याकडे सौर ऊर्जेचा वापर करण्याकडे सर्वसामान्यांचा कल वाढला आहे. मात्र, हा कल व्यक्तिगत पातळीवर होता. मात्र, आता टाटा वीज कंपनी महालक्ष्मी येथील गृहनिर्माण संकुलाच्या माध्यमातून एकत्रित सामूहिक वीज निर्मितीचा प्रकल्प राबवत आहे.
सोसायटीसाठी लागणाऱ्या विजेपैकी 65 टक्के वीज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून तयार केली जाणार आहे, तर उर्वरित 35 टक्के विजेचा पुरवठा हा सर्वसामान्य पद्धतीने केला जाणार आहे. सोसायटीत राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पात 3 मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होणार आहे. सोसायटी आणि टाटा वीज निर्मिती कंपनी 'टीपीआरईएल'मध्ये 25 वर्षांसाठी हा करार केला जाणार आहे. 'टीपीआरईएल'कडून हा प्रकल्प उभारला जाणार असून त्याचे संपूर्ण ऑपरेशन तसेच देखभाल करण्याचे कामही कंपनी करणार आहे.