मुंबई (Mumbai) : देशातील पहिले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत (Navi Mumbai International Airport) उभारले जात असले तरी विविध कारणांमुळे विमानतळाचे काम रखडले आहे. परिणामी विमानाचे टेक-ऑफही लांबणीवर पडले आहे, असे असले तरी सिडकोने (Cidco) आता २०२४ ची नवीन डेडलाइन जाहीर केली आहे. विमानतळ उभारणीचे काम अदानी समूहाकडे (Adani Group) वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन टेक-ऑफ (Take-Off) होईल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी (Sanjay Mukherjee) यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पासाठी सिडको नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे.
पनवेलजवळ ११६० हेक्टर जागेवर सोळा हजार कोटी रूपये खर्चून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे. या विमानतळाच्या उभारणीचा ठेका जीव्हीके या कंपनीला देण्यात आला होता. त्यानुसार जीव्हीकेने विमानतळाच्या पहिल्या टप्यातील प्रकल्पपूर्व कामांना सुरूवातही केली होती. परंतु ही कामे अंतिम टप्यात असतानाच आर्थिक अडचणीमुळे जीव्हीकेने माघार घेतली. त्यामुळे ऑगस्ट २०२० मध्ये नवीन ठेकेदार म्हणून अदानी समूहाचा या प्रकल्पात शिरकाव झाला.
विशेष म्हणजे अदानी समूहाकडे विमानतळाच्या कामाची हस्तांतरण प्रक्रियाही आता पूर्ण झाली आहे. सिडकोच्या संचालक मंडळासह राज्य सरकारच्या संबंधित विभागानेही त्यावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे अदानी समूहाकडून विमानतळाच्या कामाला लवकरच सुरूवात केली जाईल, असा विश्वास डॉ. मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे. तीन टप्यात उभारल्या जाणाऱ्या या विमानतळाला २००८ मध्ये केंद्र सरकारची परवानगी मिळाली. त्यानंतर २०१२ पर्यंत पहिला टप्या पूर्ण होणे अपेक्षित होते. पण भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तसेच आवश्यक विविध प्राधिकरणांच्या परवानगी आदींसाठी विलंब झाला. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्यास २०१६ ची वाट पाहवी लागली. सुरूवातीच्या काळात पुनर्वसन आणि प्रकल्पपूर्व कामांवर भर देण्यात आला.
१८ फ्रेब्रुवारी २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानुसार २०१९ मध्ये नवी मुंबई विमानतळावरून पहिले टेकऑफ होईल, असे जाहीर केले होते. परंतु हा मुहूर्तही टळला. त्यानंतर २०२० चा मुहूर्त निश्चित करण्यात आला. परंतू हे संपूर्ण वर्ष कोविडविरूध्द लढण्यात गेल्याने विमानाच्या उड्डाणाला पुन्हा ब्रेक लागला. त्यानंतर पुन्हा २०२२ चा मुहूर्त जाहीर करण्यात आला. परंतू स्थलांतराला ग्रामस्थांचा होत असलेला विरोध, कोरोनाचा संसर्ग व ठेकेदाराची माघार आदी कारणांमुळे विमानतळाच्या कामाला खीळ बसली आहे. त्यानंतर आता २०२४ ची नवीन डेडलाईन जाहीर केली आहे.
नवी मुंबई विमानतळाचे काम तीन टप्यात पूर्ण करण्याची योजना आहे. यातील पहिल्या टप्यात वर्षाला १ कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्यात अडीच कोटी प्रवाशांची ने-आण करता येणार आहे. तिसऱ्या टप्यात सहा कोटी प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे. विमानतळ प्रकल्पपूर्ण होण्याअगोदरच त्याच्या नामकारणाचा वाद सुरु झाला आहे. राज्य सरकारने प्रस्तावित अंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी स्थानिक प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी अलीकडेच मोर्चाही काढला होता.