मुंबई (Mumbai) : मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या बेस्टच्या (BEST) प्रवाशांना उन्हातान्हात बसची वाट पाहताना होणारा त्रास कमी करण्यासाठी मुंबई महापालिका (BMC) आणि बेस्ट प्रशासनाकडून बस थांब्याना पर्यावरणपूरक (Ecofriendly) 'लूक' दिला जात आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व पश्चिम उपनगरातील 105, तर दुसऱ्या टप्प्यात 100 अशा एकूण 205 बस थांब्याना नवा 'लूक' दिला जात आहे. यासाठी 17 कोटी 50 लाख रुपये खर्च केले जात आहेत.
बेस्ट बसमधून सुमारे 30 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवाशांना बस थांब्यावर बसची वाट पहावी लागते. बेस्टचे बहुतेक थांबे हे एका खांबाचे किंवा लोखंडी होते. यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात उन्हाचे चटके खावे लागत होते. बस थांबे लोखंडी असल्याने उन्हाने तापल्याने थांब्यामधील आसनावर प्रवाशांना बसताही येत नव्हते.
बेस्टच्या प्रवाशांना दिलासा देता यावा यासाठी महापालिका व बेस्टने सुटसुटीत आसन व्यववस्था, आकर्षक रचना, पारदर्शक काचा तसेच बस थांब्यावर हिरवळ निर्माण करून पर्यावरण पूरक बस थांबे उभारण्यास सुरवात केली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा विकास निधीमधून या बस थांब्याचे काम केले जात आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. ते बसचा वापरही मोठ्या प्रमाणात करतात. या प्रवाशांना व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बस थांब्याना नवा लूक दिला जात आहे. दक्षिण मुंबईत पर्यटकांची संख्या जास्त असलेल्या रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई विद्यापीठ, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथील पदपथांचे सुशोभीकरण करताना बेस्टच्या थांब्याना नवा लूक देण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात ओशिवरा येथे 15, गोवंडी 12, देवनार 11 तर गोरेगाव येथील 10 बस थांब्याना नवा लूक दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, मुलूंड, सांताक्रूझ, वांद्रे, गोराई, मागाठाणे, मालाड, मालवणी येथील बस थांबेही बदलले जाणार आहेत.
बेस्टचे सुरवातीला लाल रंगाने रंगवलेले बस थांबे होते. त्यानंतर त्यात बदल करून बस क्रमांकाचे खुले थांबे, लोखंडी आणि स्टीलचे बस थांबे असा थांब्याचा लूक होता. बेस्टने प्रवाशांच्या सोयीसाठी एसी बसेस आणल्या आहेत. बस कधी येणार याची माहिती प्रवाशांना मिळावी, प्रवाशांना तिकीट पास मिळावे यासाठी 'चलो ऍप'ही सुरू केले आहे.