मुंबई (Mumbai) : ऐन दिवाळीत एसटी महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने त्याचा एसटीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. संप मिटल्यानंतर एसटी महामंडळाला झालेला तोटा भरून काढण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले जात आहेत. एसटीच्या अनेक विभागांमध्ये चालकांची कमतरता आहे. त्यामुळे संप मिटल्यानंतर काही दिवसांतच एसटी महामंडळात चालकांच्या भरतीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसची एसटीच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने पाच हजार चालकांची भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. एसटी प्रशासनाने नुकतीच त्यासंबंधीचे टेंडर जाहीर केले आहे.
एसटी प्रशासनाने नुकतीच त्यासंबंधित टेंडर जाहीर केले असून राज्यभरातील प्रत्येक विभागवार कंत्राटी चालकांची भरती केली जाणार आहे. एसटी महामंडळात वेतनावर सर्वाधिक खर्च होत असल्याने खर्चकपातीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगितले जात आहे. कंत्राटी चालकांच्या नियुक्तीमुळे एसटीच्या वेतनावरील खर्च कमी होणार असल्याचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक सुहास जाधव यांनी सांगितले.