मुंबई (Mumbai) : राज्य परिवहन महामंडळाच्या 'एसटी'च्या संचालक मंडळाची आज 302 वी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
विशेषतः आजच्या बैठकीत सुमारे ४ हजार नव्या गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाची प्रत्येक तीन महिन्याला नियमित बैठक पार पडत असते, मात्र राज्यातील सत्तांतरामुळे चार महिन्यांनी ही पहिलीच बैठक होत आहे. त्यामुळे बैठकीत कोणते नवीन निर्णय होतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
एसटी महामंडळाला कोविड आणि संपातून बाहेर काढण्यासाठी महत्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जाणार आहेत. सध्या महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी आहे, ज्या गाड्या आहेत त्यांची स्थिती देखील वाईट आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आणि गाड्यांची संख्या कमी अशी स्थिती सध्या महामंडळाची झाली आहे. एसटी महामंडळात नवीन 4000 गाड्या दाखल होऊ शकतात, अशी चर्चा आहे. ज्यात सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील. दोन हजार इलेक्ट्रिक गाड्या भाडे तत्वावर घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठकीत कोणते नवीन निर्णय होतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.