मुंबई (Mumbai) : चारकोप, गोराईतील जागतिक बँक प्रकल्पातील काही जुन्या सोसायट्यांचा पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. या सोसायट्यांचा स्वतंत्र पुनर्विकास झाल्यास येथे विविध पायाभूत सुविधांच्या समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे या सोसायट्यांचा समूह पुनर्विकास करण्यासाठी यापूर्वी देण्यात आलेल्या एनओसीला तात्पुरती स्थगिती देऊन वसाहतीचा सुनियोजित पुनर्विकास करण्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करावी, अशी सुचना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती घोसाळकर यांनी केली आहे.
जागतिक बँक प्रकल्पाअंतर्गत चारकोप येथे 750 व गोराई येथे 280 बैठ्या चाळी आहेत. या दोन्ही ठिकाणी असलेल्या काही सहकारी गृहनिर्माण संस्थाना पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले आहे. यामुळे येथे विविध पायाभूत सुविधा निर्माण होऊ शकणार नसल्याचे घोसाळकर म्हणाले. जुन्या सोसायट्यांचा स्वतंत्र पुनर्विकास न करता येथे समूह पुनर्विकास योजना राबविल्यास सर्व सुविधायुक्त आधुनिक वसाहती निर्माण करता येऊ शकतील. तसेच रस्ते, बाजार, मंडई, दवाखाने, पोलीस स्थानके अशा सर्व सोयीचे नियोजन सुटसुटीतरित्या करता येऊ शकेल, अशी सूचना घोसाळकर यांनी केली आहे.
यासाठी मंडळाने सोसायट्यांना दिलेली एनओसी तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. तसेच समूह पुनर्विकासास मान्यता असलेल्या संस्थांनी मंडळास लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावे तसेच मंडळाने देखील समूह पुनर्विकासास चालना देण्याबाबत कार्यवाही करावी असे घोसाळकर यांनी सांगितले. या वसाहतीचा सुनियोजित पुनर्विकास करण्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करावी व त्या माध्यमातून पुनर्विकास प्रकल्पात पायाभूत सुविधा देण्याबाबत प्राधान्याने विचार करुन नियोजनबद्ध प्रकल्प आकाराला आणावा, अशी सूचना घोसाळकर यांनी प्रशासनाला केली आहे.