मुंबई (Mumbai) : वसई विरार महानगरपालिकेने (Vasai-Virar Municipal Corporation) ठेकेदाराकडून खरेदी केलेल्या स्मार्ट टॉयलेटची सध्याची बाजारात ३ ते ४ लाख किंमत आहे. असे असतानाही महापालिकेने ही शौचालये दुप्पट किंमतीत खरेदी केल्याचा आरोप आहे.
तसेच ठेकेदाराचे १० वर्षांचे दायित्व असूनही स्मार्ट शौचालये भंगारात गेली आहेत. ८० लाख रुपये मोजूनही या शौचालयाकडे ठेकेदार लक्ष देत नसल्याने हा पैसा पाण्यात गेला आहे. सन २०२८ पर्यंत या शौचालयाची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदाराचे असतानाही महापालिकेनेही याकडे लक्ष दिलेले नाही. परिमाणी ही शौचालये भंगारात गेली असून त्याचे अनेक भाग चोरट्यांनी पळविले आहेत. आयुक्तांनी याप्रकरणाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
वसई विरार महापालिकेने सन २०१९ मध्ये आठ प्रभागात नागरिकांच्या सुविधेसाठी स्मार्ट शौचालये उभारण्याचे काम एका ठेकेदाराला दिले होते. त्याच्याशी केलेल्या करारनाम्यात ठेकेदाराने शौचालये पुरविण्याबरोबर १० वर्षांचे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली आहे. पण ठेकेदाराने कोणतीही देखभाल, दुरुस्ती केलीच नसल्याने ही स्मार्ट टॉयलेट भंगारात सडली आहेत. मागील चार वर्षांपासून ठेकेदाराने याकडे ढुंकूनही पहिलेले नाही. यामुळे नागरिकांच्या खिशातील लाखो रुपये भंगारात गेले आहेत.
वसई विरार महानगरपालिकेने प्रॅनिक एन्टरप्राईजेस या ठेकेदाराला महानगरपालिकेच्या विविध कार्यक्षेत्रात स्मार्ट टॉयलेट बसविणे आणि १० वर्षांच्या कालावधीसाठी देखभाल दुरुस्ती करणे यासाठी ठेका दिला आहे. यासाठी महापालिकेने एका स्मार्ट टॉयलेटसाठी ९ लाख रुपये मोजले आहेत. पालिकेने प्रभाग समिती अ मध्ये - विरार पश्चिमेला रेल्वे स्थानक परिसरात, प्रभाग समिती ब मध्ये ओस्वाल नगरी चौक, प्रभाग समिती सी मध्ये नारंगी चौक विरार पूर्व, प्रभाग समिती डी मध्ये चंदननाका नालासोपारा पूर्व, प्रभाग समिती इ मध्ये पाटणकर सिग्नल, प्रभाग समिती एफ मध्ये संतोष भुवन, प्रभाग समिती एच मध्ये अंबाडी रोड, प्रभाग समिती आय पार नाका
महापालिकेच्या दप्तरी जरी आठ प्रभागात ही शौचालये बसवली असली तरी प्रत्यक्षात काही प्रभागात ही शौचालये आजतागायत लागलीच नाहीत असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तर ज्या ठिकाणी ही शौचालये आहेत ती पूर्णत: सडून भंगारात गेली आहेत. ठेकेदाराने त्याची कोणतीही देखभाल न केल्याचे एकाही प्रभागातील शौचालय कार्यरत नाही.
उपलब्ध शौचालयाचे साहित्य सडले अथवा चोरीला गेले आहे. त्यांची पुन्हा दुरुस्ती होऊ शकत नाही. पालिकेने या शौचालयाकडे कधीच लक्ष दिलेले नाही. पालिकेची नैतिक जबाबदारी असतानाही पालिकेने चार वर्षांत या शौचालयाची कोणतीही तपसणी केली नाही. अथवा ठेकेदाराला समज दिली नाही. पालिकेने ठेकेदाराला पाच महिन्यापूर्वी नोटीस बजावली होती. पण ठेकेदारावर अजूनही कोणतीही कारवाई पालिकेने केली नाही.