महायुतीने महापालिकेचे तीन मोक्याचे भूखंड विकायला काढले; आदित्य ठाकरे कडाडले

Aditya Thackeray
Aditya ThackerayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबईतील तब्बल अकराशे एकर जागा अदानींच्या घशात फुकटात घातल्यानंतर महायुतीने महापालिकेचे तीन मोक्याचे भूखंड विकायला काढले आहेत. ते भूखंडही अदानी आणि खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा जोरदार हल्ला शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला.

Aditya Thackeray
BIG NEWS : राज्य सरकारकडून 'ते' 103 सरकारी निर्णय आणि 8 टेंडर रद्द

कोळी बांधव मासे विक्रीचा व्यवसाय करतात ती क्रॉफर्ड मार्केटजवळची छत्रपती शिवाजी महाराज मंडई, मलबार हिलचे बेस्टचे पॉवर स्टेशन आणि वरळीतील अस्फाल्ट प्लांटच्या जागेचा लिलाव करण्यात येणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने मुंबई महापालिकेची आर्थिक घडी बसवलेली होती. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, मेडिकल कॉलेज अशा सोयीसुविधा देताना कधीही मुंबईकरांवर टॅक्स लावला नाही. शिवसेना महापालिकेत सत्तेवर असताना 92 हजार कोटींच्या ठेवी वाढवल्या. परंतु आता महापालिका दीड ते दोन लाख तुटीत गेली आहे. सरकारने रस्ते घोटाळ्यासह अनेक घोटाळे करतानाच महापालिकेचे हजारो कोटी लुटले. महापालिका तुटीत असल्याचे सांगून प्रशासकांच्या माध्यमातून मुंबईतील तीन मोक्याचे भूखंड सरकारने विकायला काढले आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray
Mumbai : MMR मध्ये गिरणी कामगारांना 81 हजार घरे; ‘त्या’ दोन कंपन्यांना काम

क्रॉफर्ड मार्केटच्या मंडईची जागा विकल्यानंतर शिंदे सरकार वरळी, वांद्रे, जुहू, वर्सोवा येथील कोळीवाडेही क्लस्टर करून अदानींच्या घशात घालेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. माशांच्या वास आला की नाकाला रुमाल लावणाऱ्या पियुष गोयल यांच्यासारख्या लोकांसाठी सरकारची ही धडपड सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई, महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांविरोधात उद्धव ठाकरे आणि आपला लढा सुरू आहे. सगळे लुटारू आमचे प्रतिस्पर्धी आहेत, असे सांगतानाच, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मोक्याच्या जागा विकत घेण्यासाठी लिलावात सहभागी होणाऱ्यांची फौजदारी चौकशी करू, त्यांनी किती पैसे आणि खोके सरकारला दिले ते बाहेर काढू, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

महानगरपालिका विकण्याचे सरकारचे काम सुरू आहेच, पुढे कदाचित हुतात्मा स्मारकही लिलावात काढून तिथे अदानींचा ए किंवा गुजरातचा जी लावतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले. निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतरही ठिकठिकाणी सरकारी होर्डिंग दिसत आहेत, पोस्टर दिसत आहेत, रेल्वेमध्ये जाहिराती सुरू आहेत याकडे लक्ष वेधतानाच आचारसंहितेत कुणाला कोणती परवानगी आहे हे निवडणूक आयोगानेच सांगावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना, कोणत्याही समित्या नसताना प्रशासकांना लिलाव करण्याचा अधिकार दिला कोणी, असा संतप्त सवाल करतानाच याला मुख्यमंत्री शिंदे जबाबदार आहेत, असा आरोपी आदित्य ठाकरे यांनी केला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com