मुंबई (Mumbai) : मुंबई शहरात 400 किमी रस्त्यांच्या कामांना सुमारे 6 हजार कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या निधीच्या कामाला प्रशासकाने मंजुरी देणं हा सर्व पक्षांच्या नगरसेवकांचा अपमान आहे. तसेच महापालिकेच्या रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा घोटाळा होत आहे. यातील स्कॅम, सेटिंग आणि स्केल उघड केल्यानंतर महापालिकेने ती सर्व टेंडर, कंत्राटं रद्द करायला हवे होते आणि पुन्हा एकदा वेगळी नियमानुसार टेंडर आणि कंत्राट बनवणे गरजेचं होतं. मात्र, महापालिकेचे प्रशासक सध्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून आदेश घेतात, अशी घणाघाती टीका करत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.
शिवसेना भवन येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, परवा मी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या रस्त्यांच्या कामांमध्ये कसा घोटाळा होत आहे. म्हणजे स्कॅम, सेटिंग आणि स्केल यात कुठे गफलत होते, हे उघड केल्यानंतर महापालिकेने ती सर्व टेंडर, कंत्राट रद्द करायला हवे होते आणि जी सत्य परिस्थिती होती ती मान्य करून पुन्हा एकदा वेगळी नियमानुसार टेंडर आणि कंत्राट बनवणे गरजेचं होतं. पण तसं न करता तीन चार पीआरओ बसवून एक प्रेस नोट काढण्यात आली. ती प्रेसनोट आपण वाचली असेल, ती प्रेसनोट कुणालाही पटणारी नव्हती. त्याच अनुषंगाने मी महापालिका प्रशासकांना पत्र लिहित आहे. त्यांना पत्र लिहिण्याचं कारण वैयक्तिक नसून महापालिकेत आता महापौर नाही, स्थायी समिती नाही, जिथे कोणताही लोकप्रतिनिधी नाही, जनरल बॉडी नाही, तिथे प्रशासकाची जबाबदारी असते. आणि प्रशासक हे आदेश घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून घेत आहेत, असा घणाघाती टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
मुंबईतील रस्त्यांच्या कामाबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, यात माझे मूळ दहा प्रश्न आहेत, जे मी त्यांच्यासमोर ठेवत आहे. त्यांच्याकडून जी प्रेसनोट आली त्यात कुठेही स्केलबद्दल उत्तर नाही, स्कॅम बद्दल किंवा सेटिंग बद्दल उत्तर नाही. चारशे किमीचे रस्ते हे होणार कसे, कुठेही उत्तर आलेलं नाही. उत्तर सीसीटीव्ही, कमिटी नेमू यात आली आहेत. पण हे सगळं कधी होतं, जेव्हा रस्त्याची कामं सुरू होतात. पण, मुंबईकरांचा पैसा वापरून हे रस्ते एका वेगळ्या पद्धतीने बांधायचा प्रयत्न करता, त्यावरच माझे दहा प्रश्न आहेत, त्याची उत्तरं त्यांनी द्यावीत. पहिला प्रश्न हाच येतो, हे चारशे किमीचे रस्ते हे कुणी सांगितले की बनवायचे आहेत.
एरवीच्या पद्धतीने रस्ते बनवायचे असतील तर मूळ हक्क नगरसेवकाचा असतो. ते तिकडच्या वॉर्ड ऑफिसमधून ते प्रभाग समितीमध्ये येतात. ते रस्ते असतात ते रस्ते आणि पूल विभागात येतात. हे रस्ते कुणी सूचवले किंवा सूचना दिल्या. काही गल्ल्या अतिशय अरुंद आहेत. काही रस्ते हे दहा वर्षांपूर्वी तयार केलेले आहेत, आणि ते नीट आहेत. इतर देशात वापरण्यात येणारं तंत्रज्ञान मुंबईच्या रस्त्यांसाठी वापरण्यात येऊ शकत नाही कारण त्या रस्त्यांखाली 42 प्रकारच्या संरचना आहेत. मग ती पाण्याची पाईपलाईन असेल, पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी लाईन, गटारं आहेत, हे सगळं सांभाळून तुम्ही रस्ते कसे बनवणार?, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, दुसरा प्रश्न असा की एखाद्या लोकशाहीमध्ये एवढं मोठं 6 हजार कोटींचं काम हे एका प्रशासकाने मंजूर करणं म्हणजे स्वतःच अर्ज देऊन स्वतःच मंजुरी देणं, हे कितपत योग्य आहे. म्हणजे मूळ पद्धत चुकलेली आहे. आता कोरोनाचं प्रमाण इतकं मोठं नाही. म्हणजे कोरोना असला तरी तो नियंत्रणात आहे. गेल्या दोन वर्षांसारखं लॉकडाऊन नाही. आता निवडणुका होणं गरजेचं आहे. त्या कधीही होऊ शकतात. अशा परिस्थितीत रस्त्यांची मोठी संख्या आणि त्याचा निधी मान्य करणं लोकशाहीनुसार कितपत योग्य आहे? अन्यथा इतर वेळी पारदर्शकपणे ही कामं होत असतात. पहिल्यांदा आपल्याला असं दिसतंय की एवढ्या मोठ्या संख्येत काम होताना, हे कुठेही लोकप्रतिनिधींना विचारलं जात नाही. हा प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकाचा अपमान आहे. हे त्यांना पटणारं आहे का? तिसरं म्हणजे, सहा हजार ऐंशी कोटी इतका निधी यासाठी ठेवण्यात आला आहे. हे सहा हजार कोटी तुम्ही अर्थसंकल्पात कसे दाखवणार? नेमके कोणत्या निधीतून तुम्ही हा निधी वळता केला आहे. कारण, अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेत प्रत्येक घटकासाठी वेगळा अर्थसंकल्प मान्य केला जातो.
जसं, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा शिवसेनेच्या काळात मान्य झालेला प्रकल्प होता. उद्धव ठाकरे यांचं ते स्वप्न होतं. त्या योजनेवर फोटो घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लावताहेत. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण हा निधी तुम्ही नेमका कसा दाखवणार आहात. चौथं म्हणजे या सगळ्या कामाला कोणती काळमर्यादा दिली आहे का, कारण त्यांच्या प्रेसनोटमध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.