मुंबई (Mumbai) : मुंबईत रस्त्यांचे कोणतेही काम प्रत्यक्ष सुरू झाले नसतानाही कंत्राटदारांना 6 हजार 80 कोटींपैकी 8 महिने आधीच 10 टक्के म्हणजे 650 कोटी देणे म्हणजे मुंबईकरांच्या पैशाची उघडपणे लूट आहे. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाच्या नावाखाली, या मेगा प्रकल्पातून मुंबईकरांची होणारी लूट थांबवा, असे मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.
मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी 6 हजार 80 कोटी रुपयांची टेंडर मंजूर करून 5 कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. यासाठी कंत्राटदारांना लागणारी 10 टक्के रक्कम आगाऊ देण्यात आली आहे. मात्र, कंत्राटदारांनी रस्त्यांच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्या अजूनही घेतलेल्या नाहीत. प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामाला ऑक्टोबरपासून सुरुवात केली जाणार आहे तर मग कंत्राटदारांना महापालिका 8 महिने आधीच पैसे का देत आहेत? यामुळे महापालिकेला एकूण मुद्दलातून 650 कोटींचे तर व्याजापोटी 30 कोटींचे नुकसान होणार आहे, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
मुंबई महापालिका सर्वसामान्यांना शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते यासारख्या सुविधा माफक दरात पुरवत असते. मुंबईत रस्त्यांसाठीही महापालिका दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करत असते. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत सुमारे 2 हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. मुंबईत दर्जेदार रस्ते तयार करण्यासाठी महापालिकेने सर्व रस्ते टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटचे करण्याचे धोरण आखले आहे.
यानुसार महापालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे 989.84 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून देखभालीचा खर्चदेखील कमी असल्याने काँक्रीटचे रस्ते बनवण्यात येत आहेत. मात्र, जानेवारी महिन्यात मुंबई महापालिकेने सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामासाठी कंत्राटदारांना 10 टक्के आगाऊ रक्कम दिली आहे. त्यामुळे 650 कोटींचे नुकसान होणार आहे तर त्यावरील व्याजापोटी दरदिवशी 3.5 कोटी म्हणजे 8 महिन्यांत 30 कोटींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही आगाऊ रक्कम देऊ नये, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी महापालिकेचे प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.