मुंबई (Mumbai) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर ४२ वा टप्पा आणि प्रकल्पातील अंतिम भुयारीकरणाचा टप्पा नुकताच पार पडला. अपलाईन मार्गावरील या भुयारीकरणास एकूण ४३ दिवसांचा कालावधी लागला. यामध्ये ५५८ काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला. त्यानंतर नुकतीच प्रत्यक्ष भुयारात मेट्रो-३ची रेल्वे चाचणी घेण्यात आली आहे. मुंबई अंडरग्राऊंड मेट्रोची ही पहिली ट्रायल यशस्वी झाली आहे. ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ची ही चाचणी पार पडली आहे. colaba bandra seepz metro trial run
मेट्रो-३ मार्गातील सर्वांत लांब पट्ट्यांपैकी एक असलेल्या पॅकेज-३ मध्ये मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. पॅकेज-३ अंतर्गत महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचे ८३७ मीटरचे सर्वांत आव्हानात्मक भुयारीकरणाचे काम रॉबिन्सच्या टीबीएम तानसा-१ने यशस्वीरित्या पूर्ण केले. ज्या ठिकाणी भुयाराचे काम पूर्ण झाले. तिथे मेट्रो रेल्वे लाईन तीनकडून ही चाचणी करण्यात आली. भुयारामधील मेट्रो रेल्वेची चाचणी नुकतीच घेण्यात आली.
बहुचर्चित मुंबई मेट्रो मार्ग लाइन ३ एक्वा लाईन म्हणूनही ओळखळी जाते, ही ३३.५ किमी लांबीची पूर्णपणे भूमिगत लाईन आहे. दक्षिण मुंबईतील कफ परेड आणि उत्तर मुंबईतील सिप्झ आणि आरे यांच्यातील अंतर व्यापते. यात २६ भूमिगत मुंबई मेट्रो स्थानके आणि एक दर्जेदार स्टेशन असणार आहे. हा मुंबई मेट्रो मार्ग मुंबई विमानतळावरूनही जाईल. ज्यामुळे या प्रदेशातील कनेक्टिव्हिटीला आणखी चालना मिळेल. या मार्गाच्या बांधकामासाठी एकूण २३,१३६ कोटी रुपये खर्च आला आहे. या मार्गावर लाईन १ मरोळ नाका आणि लाईन २ बीकेसी आणि लाईन ६ सीप्झसह इंटरचेंज असेल.