मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून महाराष्ट्रात उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जातील. वेगवेगळ्या क्षेत्रांतील उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत संकल्प ते सिध्दी (नवा भारत, नवे संकल्प) परिषद आज सकाळी हॉटेल द ताजमहल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह सीआयआयचे पदाधिकारी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना भारताच्या येणाऱ्या पुढच्या 25 वर्षांत नेमकी काय प्रगती आणि विकास करायचा आहे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. समतोल विकास साधत असताना पायाभूत सुविधांसह राज्यातील प्रत्येक क्षेत्रावर लक्ष देण्यात येणार आहे. महाराष्ट्राची उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर असे राज्य अशी ओळख असून, ती कायम टिकविण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या पाच वर्षांत समृध्दी महामार्गाचे काम पूर्ण करण्याबरोबरच खालापूर ते सिंहगड येथे सर्वात मोठा बोगदा बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. हा बोगदा बांधण्यात आल्याने आता मुंबईहून पुण्याला जाताना वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. आजच्या काळात राज्याची प्रगती ही पायाभूत सुविधांचे जाळे किती विकसित आहे यावरून ठरत असते, असे म्हटले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या काळात रस्त्यांचे आणि पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारीकरण यावर भर देण्यात येणार आहे.
मी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात उद्योजकांना भेटत असून, येणाऱ्या काळात कौशल्य विकास, कृषी या क्षेत्रास महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहनही शिंदे यांनी योवळी केले. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे, असे शिंदे म्हणाले.